वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
येथील कलिंगा स्टेडियमवर रविवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेतील सामन्यात स्पेनने यजमान भारताचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या स्पर्धेतील भारताचा हा दुसरा सामना होता. भारताने सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून आपल्या मोहिमेला प्रारंभ केला होता.
रविवारी झालेल्या या सामन्यात 16 व्या मिनिटाला स्पेनचे खाते सिमोने उघडले. त्यानंतर मार्क मिरालेसने 26 व्या मिनिटाला आपल्या संघाचा दुसरा गोल केला. स्पेनने भारतावर 2-0 अशी आघाडी मिळविली होती. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंगने 27 व्या मिनिटाला गोल नोंदवित स्पेनची आघाडी थोडी कमी केली. मध्यंतरापर्यंत स्पेनने भारतावर 2-1 अशी आघाडी मिळविली होती. सामन्याच्या उत्तरार्धात दोन्ही संघांकडून प्रत्येकी 1 गोल नोंदविला गेला. 54 व्या मिनिटाला अभिषेकने भारताचा दुसरा गोल करून आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. पण सामना संपण्यास चार मिनिटे बाकी असताना मार्क रेनीने स्पेनचा तिसरा आणि निर्णायक गोल नोंदवून भारताचे आव्हान संपुष्टात आणले. या सामन्यातील पहिल्या पंधरा मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांकडून गोल नोंदविला गेला नाही. आता या स्पर्धेत भारताचा पुढील सामना न्यूझीलंडबरोबर 4 नोव्हेंबरला होणार आहे.









