ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये मोठी वृद्धी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील 8 कोर सेक्टर्सचे (मूलभूत उद्योग) उत्पादन सप्टेंबर महिन्यात मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. कोळसा, खत, सिमेंट आणि वीज क्षेत्रांच्या दमदार कामगिरीमुळे सप्टेंबरमध्ये 8 मूलभूत उद्योगांचे उत्पादन 7.9 टक्क्यांनी वाढले आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून यासंबंधीची आकडेवारी जारी करण्यात आली आहे.
ऑगस्ट महिन्यात मूलभूत उद्योगांमधील उत्पादनवाढ 4.1 टक्के राहिली होती. तर चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 8 मूलभूत उद्योगांचे उत्पादन 9.6 टक्क्यांनी वाढले आहे. सप्टेंबरमध्ये कोळसा उत्पादन वार्षिक आधारावर 12 टक्के तर वीज निर्मिती 11 टक्क्यांनी वाढली आहे. तर रिफायनरी प्रॉडक्ट्स आउटपूटमध्ये वार्षिक आधारावर 6.6 टक्क्यांची वृद्धी दिसून आली आहे. तर खतांचा उत्पादन दर मागील वर्षाच्या तुलनेत 11.8 टक्के अधिक राहिला आहे.
सप्टेंबरमध्ये स्टील उत्पादन 6.7 टक्क्यांनी वाढले आहे. तर सिमेंट निर्मितीत 12.1 टक्क्यांची वाढ झाली आहे. क्रूड ऑइल आउटपुटमध्ये 2.3 टक्क्यांची घसरण झाली आहे. नैसर्गिक वायू आउटपूटमध्ये 11.7 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
मूलभूत उद्योग हे कुठल्याही अर्थव्यवस्थेचे मुख्य आधारस्तंभ असतात. अर्थव्यवस्थेत या उद्योगांचे महत्त्वाचे योगदान असते. भारतात कोर सेक्टरचा भार पाहिल्यास पेट्रोलियम रिफायनरी उत्पादने (28.04 टक्के,) वीजनिर्मिती (19.85 टक्के), स्टील उत्पादन (17.92 टक्के), कोळसा उत्पादन (10.33 टक्के), कच्चे तेल उत्पादन (8.98 टक्के), नैसर्गिक वायू उत्पादन (6.88 टक्के), सिमेंट (5.37 टक्के), खतनिर्मिती (2.63 टक्के) क्षेत्राचे योगदान आहे. 8 मूलभुत उद्योगांमध्ये कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, इस्पात, सिमेंट आणि वीज यांचा समावेश होतो.









