भारताकडून तयारी सुरू ः इस्रोचे खासगी गुंतवणुकीवर लक्ष
वृत्तसंस्था / चेन्नई
भारताने 2035 पर्यंत स्वतःचे अंतराळ स्थानक निर्माण करण्याचे लक्ष्य बाळगले आहे. या लक्ष्याची प्राप्ती करण्यासाठी नवे रॉकेट नेक्स्ट जनरेशन लाँच व्हेईकल (एनजीएलव्ही) देखील तयार करण्यात येत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) पुन्हा वापर्रक्षम असणाऱया रॉकेटच्या विकासासाठी खासगी क्षेत्रासोबत काम करण्याचा प्रस्तावही मांडला आहे.
सद्यकाळात रॉकेटच्या डिझाइनवर काम सुरू असून ते एक वर्षात पूर्ण होणार आहे. उत्पादनांसाठी खासगी उद्योगांना हे डिझाइन जारी करण्यात येणार आहे. खासगी उद्योगांना याच्या विकासाच्या प्रक्रियेत सामील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सरकारलाच सर्व गुंतवणूक करण्याची गरज भासणार नाही. उद्योगांनाही गुंतवणूक करावी लागणार आहे. या रॉकेटचे पहिले प्रक्षेपण 2030 मध्ये होऊ शकते असे उद्गार इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी काढले आहेत.

इस्रोचा युद्धातील अश्व म्हणवून घेणारे रॉकेट पोलर सॅटेलाइट लाँच व्हेईकल (पीएसएलव्ही) 1980 च्या दशकातील तंत्रज्ञानावर आधारित आहे. अंतराळ स्थानक स्थापन केल्यावर या क्षेत्रात भारताचे सामर्थ्य अधिकच वाढणार असल्याचे सोमनाथ यांनी म्हटले आहे.
भारताची हिस्सेदारी वाढतेय
अंतराळक्षेत्रासाठीच्या एका अहवालात आयएसपीए-ईअँडवाय या एजेन्सीने 2020 मध्ये 960 कोटी डॉलर्सची असणारी भारतीय अंतराळ अर्थव्यवस्था 2050 पर्यंत 1,280 कोटी डॉलर्सपर्यंत वाढणार असल्याचा अनुमान व्यक्त केला आहे. उपग्रह सेवा आणि वापराच्या क्षेत्रात 460 कोटी, भूमीविषयक कामांच्या क्षेत्रात 400 कोटी, उपग्रह निर्मतीत 320 कोटी आणि प्रक्षेपणात 100 कोटी डॉलर्सची वार्षिक कमाई 2025 पर्यंत होण्याचा अनुमान आहे. 2020 मध्ये भारत प्रक्षेपण सेवांच्या क्षेत्रात 60 कोटी डॉलर्सची सेवा प्रदान करत होता. 2025 पर्यंत वार्षिक 13 टक्के दराने ही भागीदारी वाढण्याचा अनुमान आहे.
एनजीएलव्ही रॉकेट
एनजीएलव्ही रॉकेटमुळे अंतराळ मोहीम साकारण्याचा खर्च कमी होणार आहे. याच्या माध्यमातून 10 टन वजनी उपकरणे समुद्रसपाटीपासून 35,786 किलोमीटर उंचीवरील जियोस्ट्रेशनरी ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये पोहोचविता येणार आहेत. उपकरणाला अंतराळात पोहोचविण्यासाठी प्रत्येक किलोमीटरसाठी 1,900 डॉलर्स आणि विस्तृत प्रारुपात 3 हजार डॉलर्स खर्च होणार असल्याचा अनुमान आहे. एनजीएलव्ही तीन टप्प्याचे रॉकेट असणार आहे. यात मिथेनसह तरल ऑक्सिजन म्हणून हरित इंधनाचा वापर होऊ शकेल. हे रॉकेट 2035 पर्यंत भारताचे अंतराळ स्थानक स्थापन करण्यास उपयुक्त ठरणार आहे.









