वैज्ञानिकांनी मृत्यूच्या रहस्याची केली उकल
शतकापर्यंत ऑस्ट्रियाच्या सर्वात जुन्या परिवारांपैकी एका परिवाराने स्वतःच्या तळघरात एक दुःखद रहस्य लपवून ठेवले होते. तळघरात एका मुलाची ममी कैद होती. स्टारहेमबर्ग वंशाच्या या मुलाचे मृत्यूसमयी वय 1 किंवा 2 वर्षे राहिले असेल. आता तपासणीत या मुलाचा मृत्यू अन्नपाण्याअभावी तसेच ईजा झाल्याने झाला नव्हता असे स्पष्ट झाले आहे.
लहान मुलाची ही ममी 16 व्या किंवा 17 व्या शतकातील आहे. या ममीमध्ये मुलाचे शरीर पाहता येते. मुलाचे शरीर एका रेशमी कपडय़ात गुंडाळलेले होते. परंतु मोठय़ा घराण्याचा सदस्य असूनही या मुलाची प्रकृती चांगली नव्हती. सीटी स्कॅनच्या मदतीने ममीची एक व्हर्च्युअल ऑटॉप्सी करण्यात आली, ज्यात मुलाच्या हाडांच्या सापळय़ामध्ये दोष आढळून आला. हे लक्षण कुपोषणाचे हेते, विशेषकरून व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हा दोष निर्माण झाला होता, याला रिकेट्स म्हटले जाते.

फॅट टिश्यूच्या तपासणीतून मुलाच्या वयाच्या हिशेबानुसार त्याचे वजन खूपच अधिक होते. मुलाला त्यावेळी चांगला आहार देण्यात आला असावा असे संशोधकांचे मत आहे. व्हिटॅमिन डी हे आहारातून शरीरात पोहोचत नाही. तर त्वचेत अल्ट्राव्हायोलेट रेडिएशामुळे होणाऱया रासायनिक प्रतिक्रियांद्वारे ते तयार होते. यातून हा मुलगा भोजनाच्या कमतरतेला नव्हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेला तोंड देत होता असे दिसून आले.
बालपणी हाडं मजबूत होण्यासाठी व्हिटॅमिन डी अत्यंत आवश्यक असते. हे शरीराला जीवनभर कॅल्शियम आणि फॉस्फरसला उत्तम प्रकारे अवशोषित करण्यास मदत करते. परंतु रिकेट्समुळे कुणाचा मृत्यू होत नाही, मुलाच्या फुफ्फुसांवर घातक न्युमोनियाची लक्षणे दिसून येतात, व्हिटॅमिन डीची कमतरता असलेल्या नवजातांमध्ये ही लक्षणे सामान्य असल्याचे उद्गार म्युनिच विद्यापीठाचे रोगतज्ञ एंड्रियास नेरचिल यांनी काढले आहेत.
संबंधित काळात उच्चभ्रू वर्ग स्वतःच्या त्वचेला साफ ठेवण्यासाठी उन्हात जाणे टाळत होता. युरोपीय समाजात त्या काळात उच्चभ्रू लोक असेच राहत हेते, तर कामगार अन् शेतकरीवर्ग उन्हात वावरत होता असे प्रंटियर्समध्ये प्रकाशित संशोधनात नमूद करण्यात आले आहे. इटलीत 16 व्या आणि 17 व्या शतकात फ्लोरेन्स येथे दफन करण्यात आलेल्या मुलांचे सांगाडे मिळाले असून त्यातही रिकेट्सची लक्षणे दिसून आली आहेत.









