आठवडय़ातून एकदा होणार अंमलबजावणी
प्रतिनिधी /बेळगाव
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने महिन्यातील एका शनिवारी ‘नो बॅग डे’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनापूर्वी ‘नो बॅग डे’ साजरा करण्यात येत होता. परंतु त्यानंतर बंद असलेला ‘नो बॅग डे’ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अभ्यासक्रमामध्ये नवनवीन विषय व संकल्पना रुजत असल्यामुळे पुस्तक व वहय़ांची संख्या वाढत आहे. यामुळे दप्तरांचे ओझे वाढत असून, याचा परिणाम विद्यार्थ्यांना पाठदुखी व इतर आजार होत आहेत. त्यामुळे एखादा दिवस दप्तर न आणता शाळेमध्ये विद्यार्थी यावेत या उद्देशाने ‘नो बॅग डे’चा निर्णय पुन्हा एकदा घेतला जाणार आहे.
‘नो बॅग डे’मुळे दप्तराचे ओझे कमी होईलच, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मनावरील ताणही काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या दिवशी विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायाम, खेळ व विविध उपक्रम दिले जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्येही ‘नो बॅग डे’विषयी उत्सुकता आहे.









