गुजरातमधील ‘टाटा-एअरबस 295’ प्रकल्पाचे भूमिपूजन
वडोदरा / वृत्तसंस्था
गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱयावर आहेत. यादरम्यान दुपारी त्यांनी वडोदरा येथे 5000 उद्योजकांच्या उपस्थितीत भारतीय हवाई दलाच्या ‘टाटा-एअरबस सी-295 एअरक्राफ्ट’ वाहतूक विमान निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी केली. याप्रसंगी वडोदरा येथील विमान निर्मिती सुविधा ही भारतासाठी विमान वाहतूक क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दिशेने मोठी झेप असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितले.
भारत आरमार क्षेत्रात अधिकाधिक सुसज्ज होण्याच्यादृष्टीने महत्त्वाची पावले टाकत आहे. आता आम्ही विमानवाहू जहाजे, पाणबुडय़ा तयार करत आहोत. एवढेच नाही तर भारतात बनवलेली औषधे जगभरातील लोकांचे प्राण वाचवत आहेत. मेक इन इंडिया, मेक फॉर द ग्लोब या मंत्राला अनुसरून भारत आज आपली क्षमता वाढवत आहे. आता भारत वाहतूक विमानांचाही मोठा उत्पादक बनणार आहे. आज भारतात त्याची सुरुवात होत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ‘टाटा-एअरबस सी-295 एअरक्राफ्ट’ प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभप्रसंगी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते टाटा-एअरबस सी-295 प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले. गुजरातमधील वडोदरा येथे हा प्रकल्प साकारला जात आहे. ‘एअरबस-टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे 22 हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर सध्या राजकीय वादंगही सुरू आहे. महाराष्ट्रात या प्रकल्पावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असले तरी गुजरातमध्ये नजिकच्या काळात होणाऱया विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱयांना या प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभामुळे लाभ मिळू शकतो.
भूमिपूजनावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी लवकरच भारतात ‘मेड इन इंडिया’ प्रवासी विमाने दिसतील असा विश्वास व्यक्त केला. वडोदरा येथे उत्पादित होणारी ही विमाने फक्त लष्करालाच सामर्थ्य देणार नाहीत, तर विमान निर्मितीची एक नवी परिसंस्था विकसित करेल. भारतात लवकरच ‘मेड इन इंडिया’ टॅग असणारी विमाने दिसतील, असे मोदी म्हणाले. विमान क्षेत्रात भारत वेगाने विकास करत आहे. हवाई वाहतुकीच्या बाबतीत भारत लवकरच पहिल्या तीन देशांमध्ये स्थान मिळवणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. आगामी 10 ते 15 वर्षांत आपल्याला 2 हजार प्रवासी आणि वाहतूक विमानांची गरज लागणार आहे. यावरुनच देशाची प्रगती वेगाने सुरू असल्याचे दिसून येते, असे मोदी म्हणाले.

गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही बदलत्या विचारसरणीच्या माध्यमातून विकास साधण्याचा प्रयत्न करत आहोत. गेली काही वर्षे फक्त सरकारलाच सर्व माहिती असून, त्यांनीच सर्व केले पाहिजे अशा विचाराने काम केले जात होते. अशा संकुचित विचारधारेमुळे देशातील प्रतिभा पुढे येत नव्हती. मात्र, आपल्या सरकारने आता खासगी क्षेत्रांनाही योग्य वाव आणि संधी देत वैयक्तिक आणि देशाची प्रगती करण्यासाठी कंबर कसली असल्याचे पंतप्रधानांनी पुढे सांगितले.
अभिमानाची बाब ः राजनाथ सिंह
आज देशात प्रथमच खासगी क्षेत्राकडून विमान निर्मिती सुविधेची पायाभरणी केली जात आहे. संरक्षण क्षेत्रासाठी तसेच संपूर्ण देशासाठी ही नक्कीच अभिमानाची बाब आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. तसेच आम्ही भारत सरकारचा ‘एअरबस’वरील विश्वास सार्थ ठरवणार आहोत. विश्वासाने, नम्रतेने आणि जबाबदारीच्या भावनेने कंपनी सदैव कार्यरत राहणार असल्याचे ‘एअरबस’चे मुख्य व्यावसायिक अधिकारी ख्रिश्चियन शेरर यांनी स्पष्ट केले.
22 हजार कोटींचा प्रकल्प
भारतीय हवाई दलासाठी ‘सी-295’ मालवाहू विमानांच्या निर्मितीसाठीचा 22 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातमधील वडोदरा येथे उभारण्यात येत आहे. या प्रकल्पातून भारतीय हवाई दलासाठी विमानांची निर्मिती होईल. तसेच तेथे तयार झालेल्या विमानांची निर्यातही होणार आहे. यामुळे भारतीय विमाननिर्मिती क्षेत्राला चालना मिळणार आहे. गेल्या वषी सप्टेंबरमध्ये भारताने एअरबस कंपनीशी करार केला होता. त्याअंतर्गत जुन्या अ?Ÿवरो-748 विमानांची जागा सी-295 ही अत्याधुनिक विमाने घेणार आहेत. येथे तयार होणारी विमाने प्रवासी वाहतुकीसाठीही वापरली जाऊ शकतात.
स्वदेशी निर्मितीमध्ये ‘टाटां’चा मोठा वाटा
सी-295 विमानांचा पहिला ताफा (16 विमाने) सप्टेंबर 2023 ते ऑगस्ट 2025 या काळात स्पेनच्या सेविले येथील कारखान्यातून मिळणार आहे. उर्वरित 40 विमाने ही टाटा अ?Ÿडव्हान्स सिस्टीम्स या कंपनीच्या भागिदारीतून भारतात तयार केली जातील. भारतात बनलेले पहिले विमान सप्टेंबर 2026 मध्ये वायूदलाच्या ताफ्यात येईल. युरोपच्या बाहेर सी-295चे उत्पादन होण्याचीदेखील ही पहिलीच वेळ आहे. विमानाच्या 96 टक्के भागांची निर्मिती भारतात होणार असल्याने ‘स्वदेशी’ला नवे बळ मिळणार आहे.









