नवी दिल्ली : गुजरातमध्ये ( Gujrat ) भाजप सरकारने ( BJP) राज्यात समान नागरी संहिता ( UCC ) लागू करण्यासाठी नवीन आयोग स्थापन करण्याची घोषणा केल्यावर दुसऱ्य़ाच दिवशी दिल्लीचे मुख्य़मंत्री आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधून भाजपच्या नेत्यांचा हेतू वाईट आहे असे त्यांनी सांगितले. अरविंद केजरीवाल सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधानांच्या गृहराज्यात आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी उतरले आहेत.
“राज्यघटनेच्या कलम ४४ मध्ये समान नागरी कायद्याची संहिता तयार करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे सरकारने समान नागरी कायद्याची फ्रेम तयार करावी. पण हे सर्व करताना तेथील स्थानिक समुदायांचे मत विचारात घेऊनच केले पाहिजे,” असे केजरीवाल यांनी सांगितले.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर आरोप करताना ते म्हणाले,’भाजपने आतापर्यंत काय केले? त्यांनी उत्तराखंड निवडणुकीपूर्वी असाच आयोग स्थापन केला पण निवडणूक जिंकल्यानंतर आयोगाचे सदस्य घरी गेले. आता गुजरात निवडणुकीपूर्वी, एक पॅनेल तयार करण्यात आले आहे, निवडणुका संपल्यानंतर ते देखिल घरी जातील. भाजप सरकार मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात समान नागरी कायदा का लागू करत नाहीत? जर त्यांचा खरोखरच त्यांना हा कायदा देशव्यापी राबवायचा असेल तर ते राष्ट्रीय स्तरावर का राबवत नाहीत? ते २०२४च्या लोकसभा निवडणुकीची वाट पाहत आहेत का? असा सवाल त्यांनी केला.