दिल्ली-बेंगळूर उड्डाणावेळी दुर्घटना ः सर्व 184 प्रवासी सुखरूप
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली विमानतळावर शुक्रवारी रात्री 9.45 वाजता इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाच्या इंजिनला टेक ऑफ दरम्यान आग लागली. धोका ओळखून पायलटने विमान धावपट्टीवरच थांबवले. या दुर्घटनेवेळी विमानात 184 प्रवासी होते. हे सर्व सुरक्षित आहेत. तांत्रिक बिघाडामुळे आगीच्या ठिणग्या इंजिनमधून उडाल्याची माहिती इंडिगोने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यात येत असून, यामध्ये दोषी असलेल्यांवर कारवाई केली जाईल, असे डीजीसीएने म्हटले आहे. विमानातील एका प्रवाशाने या दुर्घटनेवेळचा व्हिडीओ मोबाईलबद्ध केला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यापूर्वी गुरुवारी अहमदाबादहून दिल्लीला जाणाऱया अकासा एअरलाईन्सच्या विमानावर गुरुवारी पक्षी आदळला होता. घटनेच्या वेळी बोईंग विमान हवेत 1,900 फूट उंचीवर होते. पक्ष्याच्या धडकेने विमानाचा पुढील भाग चेपला होता.









