वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय नियंत्रण क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) अलीकडेच पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंच्या सामना मानधनामध्ये समानता आणण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने समाधान व्यक्त केले. बीसीसीआयच्या या निर्णयाबाबत आपल्याला गर्व असल्याचे त्याने म्हटले आहे. आता भारतीय क्रिकेट क्षेत्रामध्ये पुरुष आणि महिलांच्या सामना मानधनामध्ये कोणताही फरक राहणार नाही. या दोन्ही गटातील क्रिकेटपटूंना समान मानधन दिले जाईल अशी घोषणा क्रिकेट मंडळाच्या नियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये गुरुवारी करण्यात आली. बीसीसीआयचा हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे मंडळाचे सचिव जय शहा यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे आता मंडळाशी विविध श्रेणींच्या कंत्राट करणाऱया पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंचे मानधनही समान राहिल.









