- भाजप राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन सी यांचा काँग्रेस नेते राहूल गांधी यांना टोला
- व्हिजन प्लॅन घेवून जनतेसमोर जाण्याचा दिला सल्ला
प्रतिनिधी,कोल्हापूर
काँग्रेस नेते राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा नसून ती भारत तोडो यात्रा आहे. यात्रेमधून भारत जोडण्याआधी त्यांनी कॉँग्रेसमधून नेते का बाहेर पडत आहेत याबाबत विचार मंथन करावे. आधी त्यांनी काँग्रेस जोडो यात्रा करावी, मग भारत जोडो यात्रेसाठी बाहेर पडावे, असा टोला भाजप राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांनी पत्रकार परिषदेत लगावला. तसेच राहूल गांधी यांनी केवळ यात्रा काढू नये तर व्हिजन प्लॅन घेवून जनतेसमोर जावे, असा सल्ला ही दिला.
शायना एन. सी. म्हणाल्या, काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेचा उद्देश काय आहे. कोणताही व्हिजन प्लॅन न घेता त्यांची हि यात्रा सुरु आहे. मात्र देशातील जनता सुज्ञ आहे, त्यांना जनतेसाठी काम कोण करतय आणि प्रसिद्धीसाठी कोण चालतयं हे माहिती आहे. त्यामुळे राहूल गांधी यांनी व्हिजन प्लॅन घेवून जनतेसमोर जावे, त्याशिवाय त्यांच्या या यात्रेची दखल जनता घेणार नाही, असाही टोला शायना यांनी लगावला. पत्रकार परिषदेला उद्योगपती गिरीष चितळे, भाजप जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे उपस्थित होते.
उद्योगपती ठरवणार कुठे जायचं
टाटाचा एअर बस प्रकल्प ही गुजरातला गेला यासंदर्भात बोलताना शायना एन.सी म्हणाल्या, प्रकल्प कुठेही गेला तरी तो भारत देशातच सुरु होत आहे. मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गेले म्हणून महाराष्ट्र मागे राहणार नाही. राजकीय नेतृत्वांनी केवळ प्रकल्प आपल्या राज्यात सुरु करण्याची विनंती करायची असते. प्रकल्प कुठे सुरु करायचा हा निर्णय संबंधित उद्योगपतींनी घ्यायचा असतो, असे स्पष्ट केले. तसेच याहूनही चांगले प्रकल्प भविष्यात महाराष्ट्रात येतील, असा विश्वासही शायना यांनी व्यक्त केला.
व्होट बँकसाठी नोटांचे राजकारण
चलनावर देवांचे नेत्यांचे फोटो असणे याच्याशी आपण सहमत नसल्याचे सांगत शायना एन. सी. म्हणाल्या, गुजरातची निवडणुक डोळय़ासमोर ठेवून अरविंद केजरीवाल नोटांवरील फोटोचे राजकारण करत आहेत. मात्र नोटांवर कोणाचे फोटो असतील हे जनता ठरवणार. गुजरातमध्ये 27 वर्ष जनतेने भाजपवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे केजरीवाल यांनी केवळ नोटांच्या राजकारणावरुन लोकप्रियता न मिळविता विकासाची विचारधारा घेवून जनतेसमोर जाण्याचा सल्ला दिला.
महाविनाश आघाडीमध्ये राज्याचे नुकसान
मेक इन इंडियाला कोणत्याही सीमा नाही. मोठे प्रकल्प केवळ महाराष्ट्र व गुजरातमध्येचे व्हावेत असे नाही. तेथील उपलब्ध सुविधांवर संबंधित प्रकल्पचे उद्योगपती प्रकल्प कुठे सुरु करायचा याबाबतचा निर्णय घेतात. कोरोनामध्ये महाविनाश आघाडीच्या सत्ताकाळात राज्याचे सर्वाधिक नुकसान झाले. मात्र शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र पुन्हा उभारी घेत असल्याचे शायना यांनी सांगितले.









