आमदार दिगंबर कामत यांचे उद्गार : नागेशी येथे कीर्तन शिबिराचे उद्घाटन
प्रतिनिधी /फोंडा
कीर्तनातून उत्तम संस्कार घडतात. समाज प्रबोधनाचे ते प्रभावी माध्यम असून पालकांनी लहान वयातच मुलांना या कलेकडे आकर्षित केले पाहिजे, असे उद्गार मडगावचे आमदार व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केले. गोमंतक संत मंडळ संचालीत फोंडा कीर्तन विद्यालयातर्फे नागेशी येथील श्री नागेश संस्थानच्या सभागृहात आयोजित केलेल्या निवासी कीर्तन संस्कार प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
शुक्रवारी सायंकाळी शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी उद्योजक संदीप निगळय़े, नागेश देवस्थानचे अध्यक्ष दामोदर भाटकर व किर्तनकार सुहासबुवा वझे हे व्यासपीठावर उपस्थित होते. पूर्वीच्या काळी किर्तनासाठी गोव्याबाहेरुन किर्तनकार आणावे लागायचे. पण येणाऱया काळात गोमंतकीय किर्तनकारच गोव्यात किर्तने सादर करतील असे दिगंबर कामत पुढे म्हणाले. संदीप निगळय़े म्हणाले संस्कार हे बालवयातच मुलांमध्ये रुजले पाहिजेत. त्यासाठी किर्तनासारख्या संस्कारक्षम कलांची मुलांमध्ये ओढ निर्माण केली पाहिजे. दामोदर भाटक यांनी येणाऱया काळात गोव्यात मोठय़ाप्रमाणात किर्तनकार तयार होतील, असे सांगून सुहासबुवा वझे यांच्या किर्तनाविषयी चाललेल्या सामाजिक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. स्वागत व प्रास्ताविक सुहासबुवा वझेय यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दामोदर कामत तर नेहा उपाध्ये यांनी आभार मानले. यावेळी किर्तन विद्यालयाशी संबंधीत पालक सौ. दया उपाध्ये, सौ. अर्चना प्रभू, सौ. अपर्णा मणेरीकर, सौ. रचना वळवईकर, रुद्राक्ष वझे, मंगलदास साळगावकर, बाळकृष्ण कदम, शिवानंद साळगावकर, दामोदर कामत, संतोष कुर्टीकर, देवानंद सुर्लकर यांचा दिगंबर कामत यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.









