प्रतिनिधी /फोंडा
फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरच्या वाचनालयातर्फे यंदा पहिल्यांदाच दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून फोंडय़ातील वाचकांसाठी दिवाळीची ही मेजवानी ठरली आहे. सर्व प्रमुख वर्तमानपत्रांच्या दर्जेदार अंकांसह इतर नियतकालीकांचे पन्नसहून अधिक दिवाळी अंक या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते नुकतेच या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. फोंडा परिसरातील वाचकांना हे अंक घरी नेऊन वाचण्याची सोय करण्यात आली आहे.
कार्यक्रमाला कला मंदिरच्या सदस्य सचिव स्वाती दळवी, गंथपाल निशिकांत नाईक, मडगावच्या नगर वाचनालयाचे माजी ग्रंथपाल मोहनदास नाईक, वाचनालयाचे कर्मचारी प्रेमानंद गावकर, कला मंदिरचे कर्मचारी किर्ती उमर्ये, सुनिल केरकर, श्रीकांत गावडे, चित्रकार किरण नाईक आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री गोविंद गावडे म्हणाले, ग्रंथ हे माणसाचे खरे मित्र असून त्यांची आजन्म सोबत लाभते. वाचनाचे अनेक फायदे असून त्यातून वैचारिक व बौद्धिक खाद्य मिळत असते. त्यासाठी महान व्यक्तींचे चरित्रग्रंथ आवर्जून वाचावेत. महान शास्त्रज्ञ व देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या ‘अग्नीपंख’ या आत्मचरित्रातून आपल्याला जीवनात प्रेरणा मिळाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. दिवाळी अंकातून वैविध्यपूर्ण विषयावर विपुल असे साहित्य प्रकाशित होत असल्याने वाचकांनी त्याचा आवर्जून आस्वाद घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
फोंडय़ात लवकरच सुसज्ज ग्रंथालयाची पायाभरणी : मंत्री गोविंद गावडे
फोंडा तालुक्यासाठी सर्व सुविधांनी सुसज्ज अशा शहर ग्रंथालयाची पायाभरणी लवकरच होणार असल्याची घोषणा मंत्री गोविंद गावडे यांनी यावेळी केली. या ग्रंथालयासाठी तिस्क-फोंडा येथील जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राची जागा संपादन केली आहे. मात्र कोरोना महामारामुळे तब्बल तीन वर्षे या प्रकल्प उभारणीला विलंब झाला. कारण कोरोना काळात उपजिल्हा इस्पितळातील सेवा याठिकाणी स्थलांतरीत करावी लागली. फोंडय़ातील हे शहर ग्रंथालय गोव्यातील एक उत्कृष्ट मॉडेल ग्रंथालय बनविण्याचा विचार असून विद्यार्थ्यांपासून सर्वच वाचकांना आवश्यक असलेली ग्रंथसंपदा व इतर सुविधा उपलब्ध असतील असे गोविंद गावडे यांनी सांगितले. स्वागत व प्रास्ताविक निशिकांत नाईक यांनी केले. शनिवार व रविवार सोडून इतर दिवशी कलामंदिरच्या वाचनालयात वाचकांसाठी हे दिवाळी अंक उपलब्ध असतील.









