राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांचे प्रतिपादन : गोवा स्वयंपूर्ण यात्रा अंतर्गत राज्यपाल पिल्लई यांनी पर्वरी मतदारसंघात भेट
प्रतिनिधी /पर्वरी
निसर्गाने भरभरून दिलेले सौदर्य, विस्तीर्ण निळाशार समुद्र आणि त्या समुद्रा इतकीच विशाल हृदयाची प्रेमळ माणसे. यामुळे मला गोवा खूप भावला आहे. आज पर्यंत मी गोव्यातील अनेक गावाना भेटी दिल्या आहेत. त्या गावातील अनेक लोकाना भेटलो आहे. गोवा ही देवभूमी असून येथील मंदिराना ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्याचा पर्यटनदृष्टय़ा विचार करून गोव्यात ग्रामीण पर्यटनाला चालना देणे शक्मय आहे, असे प्रतिपादन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी काढले.
गोवा स्वयंपूर्ण यात्रा अंतर्गत राज्यपाल पिल्लई यांनी पर्वरी मतदारसंघात भेट दिली होती. यावेळी त्यांच्या समवेत पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पेन्ह दी फ्रान्क पंचायत सरपंच स्वप्नील चोडणकर, सुकूर पंचायत सरपंच सोनिया पेडणेकर, साल्वादोर दी मुन्द सरपंच रोशनी सावईकर तसेच तिन्ही पंचयातीचे पंच आणि सरकारी अधिकारी उपस्थित होते.
गेल्या वर्षी गावातील 71 कॅन्सर, मधुमेहग्रस्त लोक तसेच अनाथाश्रमाना आर्थिक सहाय्य देण्याच्या हेतूने ही यात्रा सुरू केली होती पण आज ही संख्या आठशेहून अधिक लोकपर्यंत पोचली आहे. पर्वरी हे शहरवजा गाव असूनही येथे विधानसभा, विधानभवन संकुल, उच्च न्यायालय असे लोकशाहीच्या तिन्ही खांबांचे प्रतिनिधित्व करणाऱया वास्तु आहेत, असे क्वचितच पाहायला मिळते. ही आमदार आणि नागरिकांना अभिमानाची बाब आहे, असे राज्यपाल पिल्लई यांनी सांगितले.
झाडांची ओळख करुन घेणार
येथील वन संपदा खूप वेगळी असून या पुढच्या काळात मी गावागावात दौरा करून झाडांची ओळख करून घेणार व त्यावर पुस्तक लिहीणार. जेणेकरून देशातील अन्य लोकाना या झाडांची ओळख होईल, असे राज्यपाल पिल्लई यांनी सांगितले.
राज्यपाल पिल्लई यांनी पर्वरी मतदारसंघाला भेट देवून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या ही खूप महत्वाची बाब आहे. कारण आजवरचे राज्यपाल आपल्या वास्तूतून बाहेर येवून समाजात मिसळत नसे. पण या राज्यपालानी या परंपरेला फाटा देवून लोकाना भेटत आहेत. गावागावातील संस्कृती, चालीरिती जाणून घेत आहेत. सक्षम लोकशाहीच्या दृष्टीने ही खूप महत्त्वाची बाब आहे, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.
राज्यपाल पिल्लई यांनी आपल्या दौऱयांतर्गत पेन्ह दी फ्रान्क येथील पुरातन चर्च आणि पर्वरी बाजार येथील वेताळ महारुद्र देवळाला भेट दिली व तेथील इतिहास जाणून घेतला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते 14 कर्करोग आणि मधुमेह रोगग्रस्त रुग्णांना आर्थिक सहाय्य देण्यात आले.
सुरुवातीला विद्या प्रबोधिनी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. सरपंच सोनिया पेडणेकर यांनी स्वागत केले. तसेच सरपंच रोशनी सावईकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रवळनाथ महिला फुगडी गटतर्फे फुगडी सादर करण्यात आली. समीर साखळकर यांनी सूत्रसंचालन केले तर स्वप्नील चोडणकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमानंतर राज्यपाल पिल्लई यांनी येथील जलशुद्धी प्रकल्पाला भेट दिली व खंवटे यांच्या कार्याची प्रशंसा केली. यावेळी मोठय़ा संख्येने लोक उपस्थित होते.









