वार्ताहर /उसगांव
सम्राट क्लब उसगावच्या नूतन अध्यक्ष समिक्षा वामन नाईक व संचालक मंडळाचा अधिकारग्रहण सोहळा नुकताच पिळये-तिस्क येथील स्व. सदाशिव मराठे समाजमंदिर सभागृहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अनिवासी भारतीय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर तर सन्माननीय पाहुणे म्हणून उसगावचे सरपंच नरेंद्र गावकर, तसेच अधिकारग्रहण अधिकारी शैलेश बोरकर, भाग्यरेखा गावस व मावळते अध्यक्ष गोविंद परब फात्रेकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी नूतन अध्यक्ष समिक्षा नाईक यांच्यासह सचिव कल्पना गावडे, खजिनदार स्वप्नील नाईक, संचालक उगम पार्सेकर, विश्वेश परब फात्रेकर, मयूर जल्मी, मनोज गावडे, कुलदीप नाईक, गोविंद बागकर, प्रसाद प्रभूगावकर व प्रभाकर सावंत यांना समर्पित भावनेने कार्य करण्याची शपथ देण्यात आली.
यावेळी बोलताना ऍड. नरेंद्र सावईकर म्हणाले, सम्राट क्लबने आपल्या कार्यातून समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सांस्कृतिक वारसा जतन करतानाच तो पुढील पिढीकडे पोचविण्याचे कार्य ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून करीत आहे. सामाजिक, शैक्षणिक व अन्य क्षेत्रातही सम्राट क्लबचे उल्लेखनीय कार्य असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. सरपंच नरेंद्र गावकर यांनी सम्राट क्लब उसगावतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असल्याचे सांगून, गेल्या वर्षी उसगाव भागातील पूरग्रस्तांना विविध प्रकारची मदत सम्राट क्लबतर्फे करण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यांच्या या कार्यात आपले नेहमीच सहकार्य असेल असे त्यांनी नमूद केले. गोविंद परब फात्रेकर यांनी स्वागत केले. विश्वेश परब यांनी मागील वर्षाचा अहवाल सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रंचालन गोकुळदास कुडाळकर यांनी तर कल्पना गावडे यांनी आभार मानले.









