अलीकडच्या काळात रशियाच्या रस्त्यांवरून पुरुष दिसेनासे झाल्याचे दिसून येत आहे. रशियाने युक्रेन विरोधात युद्ध पुकारल्यापासून ही स्थिती आहे. रशियाचे प्रशासन तरुणांची इच्छा नसताना त्यांना सैनिक बनवून युद्धावर पाठवित आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱयांच्या दृष्टीला पडू नये आणि युद्धात जाण्याची वेळ येऊ नये यासाठी रशियन पुरुषांनी रस्त्यावर फिरणेही बंद करून टाकल्याचे समजून येते. रशिया हा देश आकारमानाने मोठा असला तरी लोकसंख्या त्या मानाने कमी आहे. सध्या युक्रेनच्या युद्धात 5 ते 6 लाख सैनिक गुंतलेले आहेत. इतर पुरुष सैनिक बनविल्याच्या जाण्याच्या भीतीपोटी शहरांपासून दूर दुर्गम ठिकाणी पळुन जाताना दिसून येतात. त्यामुळे रशियाच्या अनेक शहरांमध्ये लाखोंच्या संख्येने महिला एकटय़ा पडल्याचेही दिसून येत आहे.
सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की रशियाची राजधानी मॉस्को येथील मेट्रो स्थानकांजवळ पोलीस पुरुषांना पकडून सेनेमध्ये भरती करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याचा परिणाम म्हणून जवळपास 7 लाख पुरुषांनी रशिया सोडून आसपासच्या अन्य देशांमध्ये आश्रय घेतला आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांनी दोन महिन्यांपूर्वी रशियन तरुणांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले होते. तेव्हापासूनच तरुणांचे पलायन करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसते.









