अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या पादुकाला ओवाळतानाचा काकडा सुरू झाला की लक्षात येतं प्रत्येक ठिकाणचा काकडा सारखाच. त्यांच्या पद्धती जरी वेगवेगळय़ा असल्या तरी सगळय़ांचा भाव एकच. काकडा सुरू झाला की प्रत्येकाच्या चेहऱयावर एक चैतन्याची रेष उमटते. तिथे ईश तत्त्व आपल्याला जाणवायला लागतं. सूर्यासारखं ते रोज प्रकट होणारे चैतन्य पाहिलं की लक्षात येतं. ‘सद्गुरु चेनी अभय करे प्रकट होई जे सत्वरे’. देवालाही भक्तापर्यंत यायचं असेल तर सद्गुरूंचाच आधार घ्यायला लागतो. त्याच्याशिवाय पर्याय नाहीच. आपला आत्मा पाचकोषांचा मिळून जरी झाला असला तरी आपण आनंदमय कोशाच्या खूप दूर असतो. आपण अन्नमयकोशातच अडकून राहतो. साऱया जीवनभर या अन्नासाठीच उलाढाली करत असतो. पण या सगळय़ाच स्थानात उच्च स्थान दिले आहे ते त्या आनंदाला. आनंद हा अंतरात्म्याला होत असतो आणि सुख मात्र इंद्रियांना होतं जे पुन्हा पुन्हा आम्हाला घ्यावसं वाटतं पण ज्याला आनंद मिळाला आहे तो पुन्हा कुठल्याच गोष्टीसाठी प्रयत्न करत नाही. आणि म्हणूनच स्वामींसारख्या सगुण विभूती अनेक शतकानंतर या पृथ्वीतलावर प्रकट होतात. जेव्हा माणूस तन, मन, धनाने अस्थिर होतो, समाजात दुराचार माजत असतो त्यावेळी अनेक पिढय़ांनी केलेले प्रयत्न पुढे फळाला येत असतात आणि अशीच पूण्याई जेव्हा फळाला आली त्यावेळेला दत्त अंशाच्या रूपाने स्वामी प्रकटले, कर्दळी वनात आले आणि भक्तांबरोबर प्रत्येक भक्ताला कणखर बनवण्यासाठी सतत नामस्मरणाचा मंत्र त्यांनी दिला. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ असं म्हणताना अनेक संकटे पार करण्याची हिम्मत प्रत्येक माणसात निर्माण झालेय. खरं तर माणूस शिक्षणाने, पैशाने सर्वांना प्रगत झालाय पण मनाने मात्र तो मागासलेलाच. कारण म्हणजे त्याचा अहंकार आपण सुखदुःखाने कोसळतो. अगदी मृत्यूलासुद्धा जवळ करतो पण स्वामी मात्र नामस्मरणाचा अतिशय सोपा मार्ग सांगून माणसाला यातून बाहेर काढतात. कली युगातील कीर्तन, भजन या सगळय़ा मनाला उभारी देणाऱया गोष्टी ठरतात आणि त्यापैकीच काकड आरती हीसुद्धा एक.
स्वामींचा कालखंड खरं म्हणजे खूप संकटांचा. तेव्हा अशी काही सुधारणा नव्हतीच परंतु समाजाला सुधारण्याचं काम त्यांनी सुरू केलं. त्यांच्या या असण्याच्या विश्वासाने आम्ही संकटांशी दोन हात करायला लागलो. खरंतर आमच्या जन्माबरोबरच मृत्यू जन्माला येतोच. दिवसाबरोबर रात्र असते. आनंदाबरोबर भीती असते पण या भीतीला घाबरून जायचं नाही हे शिकवताना स्वामी आम्हाला लढायला शिकवतात आणि स्वतः आमच्या पाठीशी उभे राहतात. स्वामींचं नामस्मरण इतके चालायचं की कबीराच्या भाषेत सांगायचं ‘राम हमारा जप करे हम बैठे आराम’..अशा भक्तीसाठी भगवंत जन्म घेत असतो. समर्थ रामदास म्हणतात, करुणा सर्वभूती जिभे नामस्मृती नित्य शोधणे सत्संगती या नावे अभ्यास इयत्ता भावे कीर्तन करावे देवाचे वैभवे नाचवावे सतकीर्तना ऐकावे या नावाभ्यास असा भक्तीचा अभ्यास करायला शिकवणारा दिवसाचा पहिला पाठ म्हणजे ही काकड आरती. माध्यमाची आणि शेजारती असे प्रकार असले तरी या काकड आरतीने सुरू झालेला आमचा दिवस कितीतरी चांगल्या कर्माची सुरुवात करून देतो. आणि चांगल्या कर्माची झालेली सुरुवात त्याचा शेवटही उत्तम होणारच ………….. ‘कीर्ती आठविता वेळोवेळा भोगीतसे महासुखांचा सोहळा’…जय श्री स्वामी समर्थ.