खचाखच भरणा, लोंबकळतच प्रवास : अनर्थ घडल्यास जबाबदार कोण?
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरात जीवघेणी वाहतूक सुरू आहे. एका वाहनात मेंढरांप्रमाणे माणसे कोंबून वाहतूक करण्यात येत आहे. बुधवारी दिवाळी पाडव्याच्या रात्री क्लब रोडवर मालवाहू वाहनात खचाखच माणसे कोंबली होती. हे कमी की काय म्हणून रिक्षाच्या पाठीमागेही काही जण लोंबकळत होते.
सिटी बसच्या दरवाजाला लोंबकळून प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदार हे चित्र नेहमीचेच बनले आहे. याला अपुरी बससेवा कारणीभूत आहे. खासगी वाहनातही अक्षरशः मेंढरांसारखे प्रवासी कोंबण्याचे जीवघेणे प्रकार बेळगाव परिसरात सुरू आहेत. बुधवारी सुसाट वेगाने धावणाऱया मालवाहू वाहनाला जर दुर्दैवाने एखादा अपघात घडला असता तर काय घडले असते, याची कल्पनाही करवत नाही.
क्लब रोडमार्गे हे वाहन वेंगुर्ला रोडकडे जात होते. या वाहनात लहान मुले तर अक्षरशः या वाहनाच्या वरच्या बाजूला असलेल्या अँगलच्या आधारे कशीबशी तग धरून होती. वाहतूक पोलीस व आरटीओ विभागाला असा जीवघेणा प्रकार दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर दुर्दैवाने अपघात घडला तर त्याला जबाबदार धरायचे कोणाला? असा संतप्त सवालही उपस्थित केला जात होता.









