सहा वर्षांत दीडशे गुरांना जीवदान, आजारी, अपघाग्रस्त प्राण्यांची सेवा
दुर्गाप्रसाद पै/ शिरोडा
गोव्यात कृषी संस्कृती नांदत होती, तेव्हा घरोघरी गुरांचे पालनपोषण होई. शेतीचे यांत्रिकीकरण झाल्याने गुरांचे महत्त्व कमी झाले. घरात गोठेच नसल्याने गुरांवर बेवारस होण्याची वेळ आली. त्यामुळे एकेकाळी दिवाळीच्या पाडव्याला घरोघरी होणारी गुरांची पूजा आता काही मोजक्याच घरांमध्ये होताना दिसते. सणासुदीला देवाचे पान दाखविण्यासाठी गुरांची आठवण होते तेवढीच. भटक्या गुरांबद्दल सर्वांच्याच मनात दया आहे. पण त्यांच्यासाठी तळमळीने वावरणारे काही मोजकेच असून त्यापैकी बोरी येथील आशय कोरडे हा तरुण एखादी गाय अपघातात जखमी झाल्यास किंवा आजारामुळे तडफडत असल्यास या मुक्या प्राण्यांच्या मदतीला धावतो. भटक्या गुरांची सुश्रुषा हा जणू त्याच्या जीवनाचा भागच बनला आहे.
आशय कोरडे हा पेशाने शारीरिक शिक्षक असून बोरीच्या स्वामी विवेकानंद वाणिज्य महाविद्यालयात तो सेवेत आहे. उत्कृष्ट क्रीडापटू म्हणून बरेच लोक त्याला ओळखतात. पण त्याचे प्राणीप्रेम जगावेळगळे आहे. जखमी व आजारी गुरांवर त्याने उपचार केले आहेत. केवळ भटकी गुरेच नव्हे, कुत्री, माकड यासह इतर प्राण्यांचीही त्याने संकटातून सुटका केली आहे. त्यासाठी त्याला वेळ काळ लागत नाही. गुरांच्या सुश्रुषेसाठी त्याने स्वतः प्रथमोपचार कीट तयार केले असून ते कायम त्याच्या गाडीत असते.

दीडशेहून अधिक गुरांना जीवदान
गेल्या सहा वर्षांपासून आशय कोरडे हा आजारी, रोगग्रस्त व अपघातग्रस्त गुरांची सुश्रुषा करीत असून त्याची सुरुवात योगायोगाने बोरी येथील गोपाळकृष्ण मंदिराजवळ झाली. रोगग्रस्त असलेली एक गाय या मंदिराजवळ व्हीवळत होती. तेथून ये जा करणाऱया प्रत्येकाला तिची दया यायची. पण तिला कशी मदत करावी हे कुणालाही सूचत नव्हते. यावेळी आशय तिच्या मदतीला धावला. तिला पाणी पाजले, खायला दिले व उपचारही केले. या प्रसंगातून जणू श्रीकृष्णानेच त्याला गोसेचा वर दिला असावा. त्याच्या हातून बोरी, शिरोडा भागासह फोंडा तालुक्यातील आसपासच्या भागातील अनेक गुरा वारसांना जीवदान मिळाले आहे. ध्यान फाऊंडेशन किंवा अन्य संस्थांच्या गोशाळांमध्ये त्याने अशा अनेक गुरांना उपचारासाठी पाठविले आहेत. खूर लागणाऱया गुरांच्या जखमांवर उपचार करुन अनेक गुरांना त्याने वेदनामुक्त केले आहे. मुक्या प्राण्यांविषयी लागलेला हा लळा त्याच्या जीवनाचा जणू भागच बनून राहिला आहे.
प्रत्येक तालुक्यात गुरांसाठी सुश्रुषा केंद्र हवे
प्रत्येक तालुका पातळीवर गोशाळा व सुसज्ज असे सुश्रुषा केंद्र हवे. जखमी किंवा आजारी गुरांची वाहतूक करण्यासाठी रुग्णवाहिकेची सोय सरकारने करणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वतंत्र योजना कार्यान्वीत केली पाहिजे. सध्या दक्षिण गोव्यात किटला केपे येथे ध्यान फाऊंडेशनचे एकच गो सुश्रुषा केंद्र असून त्यावर ताण वाढला आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात अशी केंद्रे उभारणे आवश्यक असल्याचे आशय सांगतो.
मंदिर, आश्रमानी पुढाकार घ्यावा
हिंदू धर्मांत गोमाता पुजनीय आहे. पण सणासुदीलाच बहुतेक लोकांना त्यांची आठवण होते. ही मानसिकता बदलली पाहिजे. विशेष म्हणजे मोठी देवस्थाने, मठ, आश्रम व अन्य धार्मिक संस्थांनी आपापल्या परिसरात छोटी सुश्रुषा केंद्रे उभारल्यास जवळपासच्या गुरांवर सहज उपचार होऊ शकतील. गो सेवेच्या उद्देशानेच वेगळी दानपेटी ठेवल्यास भाविक निश्चितच या पुण्यकर्मात वाटा उचलतील, असेही तो सुचवतो.
अमानुषता व तस्करीला आळा बसला पाहिजे
सध्या भटक्या गुरांविषयी अमानुषता व तस्करीचे प्रकारही वाढले आहेत. गुरांचा उपद्रव रोखण्यासाठी त्यांच्यावर विषप्रयोग, जेवणात ब्लेडचे तुकडे घालणे, त्यांच्यावर उकळते पाणी फेकण्यासारखी कृत्येही घडत आहेत. रात्रीच्यावेळी छोटय़ा वासरांची तस्करी करुन त्यांना कत्तल खान्यात विकणाऱया टोळय़ाही सक्रीय आहेत. या प्रकारांना आळा बसला पाहिजे अशी त्याची मागणी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गुरांना खाद्य देताना ते चांगले असेल याची काळजी घ्यावी. बरेच लोक प्लास्टिकच्या पोत्यात बांधून जेवण उघडय़ावर फेकून देतात व ते भटक्या गुरांच्या थेट पोटात जाते. प्लास्टिक पोटात जाऊन अनेक गुरे पोट फुगून दगावण्याचे प्रकारही वाढत आहेत. गुरांना खाद्य द्यायचेच असल्यास भाजीपाला किंवा अन्य प्रकारचे चांगले जेवणे द्यावे, असे आशय सांगतो.
सध्या अनेक युवक व सेवाभावी संस्था भटक्या गुरांची मदत व सुश्रुषेसाठी पुढे येत आहेत. त्यांना ओळखपत्रे व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. अपघात किंवा अन्य रोगामुळे गुरे गंभीर अवस्थेत असल्यास तात्काळ मदतीला धावणारी हेल्पलाईन हवी.
आशय कोरडे हा भटक्या गुरांची सुश्रुषा करीत असला तरी त्याची स्वतःची संस्था नाही. ध्यान फाऊंडेशन किंवा अन्य गोशाळा व प्राणीमित्रांची तो मदत घेतो. आशय हा निसर्गप्रेमीही आहे. महिन्यातून एकदा तो आपल्या मित्रांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबवित असतो. पावसाळय़ात दर रविवारी वृक्षारोपणाचे कार्यक्रमही आखत असतो. समाजात गुरांविषयी दयामाया असणारे लोक तसे कमी नाहीत. पण त्यांच्यासाठी वेळ देणारे, कठिण प्रसंगी तळमळीने धावणारे आशयसारखे गोप्रेमी मोजकेच आहेत म्हणून गोधन सुरक्षीत आहे.









