लंकेवर 7 गडय़ांनी मात, स्टोईनिसचे वेगवान अर्धशतक
वृत्तसंस्था/ पर्थ
सामनावीर मार्कस स्टोईनिसने नोंदवलेल्या तुफानी अर्धशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने टी-20 विश्वचषकातील सामन्यात लंकेचा 7 गडय़ांनी धुव्वा उडवित सुपर 12 फेरीतील पहिला विजय नोंदवला. स्टोईनिसने 17 चेंडूत ऑस्ट्रेलियातर्फे सर्वात वेगवान अर्धशतक नोंदवले.
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर चरिथ असालंकाच्या 25 चेंडूतील नाबाद 38 धावांमुळे लंकेने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 157 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेने ऑस्ट्रेलियाला रोखण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण स्टोईनिसच्या धडाक्यापुढे त्यांना हार पत्करावी लागली. ऑस्ट्रेलियाने 16.3 षटकांत 3 बाद 158 धावा जमविल्या. या विजयानंतर गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर असून त्यांची धावसरासरीही वधारली आहे. स्टोईनिसने 18 चेंडूत नाबाद 59 धावा फटकावताना 4 चौकार, 6 षटकार लगावले.
वेगवान गोलंदाज बिनुरा फर्नांडो पहिल्याच षटकात जखमी झाल्यानंतरही लंकेने ऑस्ट्रेलियाला बऱयापैकी रोखून धरले होते. धोकादायक वॉर्नर (11) स्वस्तात बाद झाला तर कर्णधार ऍरोन फिंचला कोंडी फोडण्यात अपयश आल्यामुळे यजमान संघावरील दडपणही वाढले होते. त्याने पहिल्या 24 धावा जमविण्यासाठी तब्बल 35 चेंडू घेतले. त्याने 42 चेंडूत नाबाद 31 धावा जमविल्या. मिशेल मार्शने चेंडूस धाव या गतीने 18 धावा जमविल्या तर मॅक्सवेलने 12 चेंडूत 23 धावांची जलद खेळी करताना 2 चौकार, 2 षटकार फटकावले. लाहिरु कुमाराच्या उसळत्या चेंडूला पुल करताना चेंडू मॅक्सवेलच्या हेल्मेटला लागला. त्यानंतर आणखी एक उत्तुंग फटका मारताना तो डीपमध्ये झेलबाद झाला.
स्टोईनिस आल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पाठलागाला वेग आला. त्याने लंकेच्या सर्वच गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवताना षटकारांचा धडाका सुरू केला आणि लंकेच्या हातातून सामना हिसकावून घेतला. त्याने व त्यांच्या अन्य फलंदाजांनी लंकेचा स्पिनर वनिंदू हसरंगाला टार्गेट केले होते. त्याच्या 3 षटकांत तब्ब्ल 53 धावा फटकावल्या गेल्या.
असालंकचा फटकेबाजी
तत्पूर्वी, विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाने शिस्तबद्ध मारा करीत लंकेच्या फलंदाजांना मोकळीक दिली नाही. असालंकाने मात्र आक्रमक खेळ करीत संघाला दीडशतकी मजल मारून दिली. त्याच्या आक्रमक खेळीमुळे लंकेने शेवटच्या चार षटकांत 46 धावा फटकावल्या. त्यात पॅट कमिन्सच्या शेवटच्या षटकातील 20 धावांचा समावेश आहे. असालंकाने त्याला सरळ षटकार मारल्यानंतर पुलचा चौकारही ठोकला. करुणारत्नेने त्याला बऱयापैकी साथ देत नाबाद 14 धावा केल्या.
प्रारंभी कुसल मेंडिस (5) लवकर बाद झाल्यानंतर पथुम निसांका (45 चेंडूत 40) व धनंजय डिसिल्वा (23 चेंडूत 26) यांनी 58 चेंडूत 69 धावांची भागीदारी करून डाव सावरला होता. ही जोडी फुटल्यानंतर ठरावीक अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले. डिसिल्वाचा वॉर्नरने अप्रतिम झेल टिपला तर निसांका चोरटी धाव घेताना धावचीत झाला. 18 व्या षटकांत त्यांची 6 बाद 120 धावा अशी स्थिती झाली होती. असालंकाने त्याला दीडशेची मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियाच्या हॅझलवुड, कमिन्स, स्टार्क, ऍगर, मॅक्सवेल यांनी एकेक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः लंका 20 षटकांत 6 बाद 157 ः निसांका 40 (45 चेंडूत 2 चौकार), मेंडिस 5, धनंजय डिसिल्वा 26 (23 चेंडूत 3 चौकार), चरिथ असालंका नाबाद 38 (25 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), राजपक्ष 7, शनाका 3, करुणारत्ने नाबाद 14 (7 चेंडूत 2 चौकार), अवांतर 23. गोलंदाजी ः हॅझलवुड 1-26, कमिन्स 1-36, स्टार्क 1-23, ऍगर 1-25, मॅक्सवेल 1-5
ऑस्ट्रेलिया 16.3 षटकांत 3 बाद 158 ः वॉर्नर 11, फिंच नाबाद 31 (42 चेंडूत 1 षटकार), मार्श 18 (17 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), मॅक्सवेल 23 (12 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), स्टोईनिस नाबाद 59 (18 चेंडूत 4 चौकार, 6 षटकार), अवांतर 16. गोलंदाजी ः धनंजय डिसिल्वा 1-18, करुणारत्ने 1-21, तीक्षणा 1-23.









