वृत्तसंस्था/ पर्थ
ऑस्ट्रेलियाचा स्टार स्पिनर ऍडम झाम्पाला कोरोनाची लागण झाली असल्याने मंगळवारी लंकेविरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात तो सहभागी होऊ शकला नाही.
एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, झाम्पाला कोरोनाची तीव्र लक्षणे नाहीत. पण सावधगिरीचा उपाय म्हणून त्याला या सामन्यात न खेळविण्याचा निर्णय घेतला गेलाय. ‘झाम्पा पूर्णपणे ठीक आहे. आमचे आता चार विविध राज्यांत चार सामने होणार आहेत. त्यामुळे दक्षतेच्या दृष्टिकोनातून आम्ही त्याला संघाबाहेर ठेवले आहे,’ असे या संघातील पेसर मिशेल स्टार्क म्हणाला. झाम्पाच्या जागी या सामन्यात ऍश्टन ऍगरला संघात देण्यात आले. मागील टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऍगरला फक्त एक सामना खेळावयास मिळाला होता, तोही सरावाचा सामना होता. आयसीसीने यावेळी कोरोनाबाधित खेळाडूला खेळविण्याची मुभा दिली असून त्यानुसार आयर्लंडच्या जॉर्ज डॉकरेलला लंकेविरुद्धच्या सामन्यात कोरोनाची लागण झाली असतानाही खेळविण्यात आले होते. पण ऑस्ट्रेलियाने तसे करण्याचे टाळले.









