वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या मंगळवारी घोषित करण्यात आलेल्या पुरुष आणि महिला बॅडमिंटनपटूंच्या ताज्या मानांकन यादीत भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने पाचवे स्थान तर थॉमस चषक जिंकणाऱया भारतीय बॅडमिंटन संघातील एच. एस. प्रणॉयने बारावे स्थान मिळविले आहे.
महिला एकेरीच्या मानांकन यादीत पी. व्ही. सिंधूने पुन्हा पहिल्या पाच खेळाडूमध्ये पुनरागमन केले आहे. घोटय़ाला झालेल्या दुखापतीमुळे पी. व्ही. सिंधूने गेल्या ऑगस्ट महिन्यातील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर एकाही स्पर्धेत आपला सहभाग दर्शविलेला नाही. पी. व्ही. सिंधूने 26 स्पर्धांमध्ये 87218 गुणासह पाचवे स्थान मिळविले आहे. या मानांकन यादीत सिंधूने काही दिवसापूर्वी दुसरे स्थानही पटकाविले होते. पण त्यानंतर तिच्या मानांकनात थोडी घसरण झाली होती. तब्बल तीन वर्षांनंतर तिने या मानांकनात पुन्हा पहिल्या पाच खेळाडूमध्ये प्रवेश केला आहे. हैद्राबादच्या पी. व्ही. सिंधूची दुखापत आता बऱयाच प्रमाणात बरी झाली असून सोमवारपासून तिने बॅडमिंटनच्या सरावाला प्रारंभ केला आहे.
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या पुरुष एकेरी ताज्या मानांकनात भारताच्या एच. एस. प्रणॉयने बारावे स्थान मिळविले आहे. 30 वर्षीय प्रणॉयने नुकत्याच झालेल्या डेन्मार्क खुल्या सुपर 750 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. प्रणॉयने 26 स्पर्धांमध्ये 64330 गुण घेत मानाकनात बारावे स्थान पटकाविले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन लक्ष्य सेन तसेच कास्यपदक विजेता किदांबी श्रीकांत हे या मानांकन यादीत अनुक्रमे आठव्या आणि अकराव्या स्थानावर आहेत.
पुरुष दुहेरीमध्ये भारताचे सात्विक साईराज रनकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी ताज्या मानांकन यादीत आठवे स्थान पटकाविले आहे. बर्मिंगहॅममध्ये झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत या जोडीने पहिले सुवर्णपदक मिळविले होते. पुरुष दुहेरीच्या ताज्या मानांकन यादीत भारताची जोडी एम. आर. अर्जुन आणि ध्रुव कपिला ही 19 व्या स्थानावर आहे. यापूर्वी ही जोडी 21 व्या स्थानावर होती. महिला दुहेरीच्या मानांकन यादीत भारताच्या त्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद त्याचप्रमाणे मिश्र दुहेरीतील जोडी इशान भटनागर आणि तनिषा क्रॅस्टो यांनी मानांकनात अनुक्रमे 27 वे आणि 29 वे स्थान मिळविले आहे. महिला एकेरीच्या मानांकनात भारताची सायना नेहवाल 33 व्या स्थानावर आहे.









