युआयडीएआयकडून मोठी घोषणा ः कोटय़वधी लोकांना होणार लाभ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना मार्च 2020 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत समाविष्ट असलेल्या सुमारे 80 कोटी लाभार्थींना प्रतिव्यक्ती प्रतिमहिना 5 किलो अन्नधान्य मोफत देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. या योजनेशी 80 कोटी नागरिक थेट जोडले गेले असल्याने याची जगभरात चर्चा होत आहे. सरकारने देशभरात जारी केलेल्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेणे आता अधिकच सोपे ठरणार आहे. रेशनकार्ड व्यतिरिक्त मोफत रेशन योजनेच्या अंतर्गत आधार कार्डद्वारेही संबंधिताला रेशन प्राप्त करता येणार आहे. यासंदर्भात युआयडीएआयकडून ट्विट करत माहिती देण्यात आली आहे.
देशभरात आधार कार्डद्वारेही रेशन घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ‘वन नेशन वन आधार’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आधार कार्डवरून देशभरात रेशन मिळविता येणार आहे. पण या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक असल्याचे युएआयडीएआयकडून सांगण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारकडून देशभरात मोफत रेशन तसेच माफक दरात रेशन देण्यात येते. युएआयडीएआयकडून आधार कार्डद्वारे मोफत रेशन मिळविण्याची सुविधा देण्यात आल्याने स्थलांतरित लाभार्थींना मोठी सुविधा होणार आहे.
आधार कार्डद्वारे देशभरात कुठूनही रेशन (अन्नधान्य) मिळविता येणार आहे. एखादा लाभार्थी देशातील अन्य ठिकाणी कामासाठी स्थलांतरित झाला असल्यास त्याला आधारकार्डद्वारे कुठल्याही समस्येशिवाय रेशन प्राप्त करता येणार आहे.
आधारकार्ड अपडेट करण्यासाठी नजीकच्या आधार केंद्राशी संपर्क साधावा लागणार आहे. तसेच अधिकृत वेबसाइटद्वारे देखील आधार केंद्र शोधता येणार आहे. आधारशी संबंधित कुठल्याही प्रकारची समस्या असल्यास टोल फ्री क्रमांक 1947 वर देखील संपर्क साधता येणार आहे. देशात आधार जारी करण्याची जबाबदारी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाकडे आहे.









