कारे कायदा ऍल्युम्नी असोसिएशनच्या कार्यक्रमात हायकोर्टाचे न्या. महेश सोनक यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /मडगाव
विविध प्रकारच्या माहितीने आपले मन भरणे हा शिक्षणाचा उद्देश नव्हे तर मन खुले (ओपन) करणे हाच शिक्षणाचा उद्देश असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश महेश सोनक यांनी मडगावात सांगितले.
मडगावात कारे कायदा महाविद्यालयाने डॉ. कार्मो डिसौझा स्मृत्यर्थ राज्य पातळीवरील पहिली अभिरुप न्यायालय स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या समारोह सोहळय़ाच्यावेळी न्या. सोनक बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर डॉ. मारियान पिन्हेरो, ऍड. संजीत देसाई, प्राचार्य डॉ. साबा दा सिल्वा व ऍड. ऍन फुर्तादो उपस्थित होते.
महाविद्यालयीन शिक्षण हे विचार करण्यास साहाय्य ठरते तसेच शिक्षण एखाद्याला सृजनशील बनवते, हीच सृजनशीलता कैकदा चुकाही करण्यास अनुमती देते. आपण काय ठेवावे आणि काय नको हे आपल्यातील कला ठरवित असते. मोठ -मोठय़ा लोकांच्या आठवणी मनात साठवून ठेवण्यापेक्षा आणि काय विचार करावा यापेक्षा कसा विचार करावा याचे ज्ञान देणे हाच शिक्षणाचा हेतू असावा असे आपले ठाम मत असल्याचे न्या. सोनक यांनी आपल्या भाषणात सांगितले.
अभिरुप न्यायालयाच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. महेश सोनक व न्या. वाल्मीकी मिनेझीस अध्यक्षस्थानी होते. अंतिम फेरी संपल्यानंतर न्या. मिनेझीस यांनी कायदा विद्यार्थ्याकडे चर्चा करताना युक्तिवाद कौशल्य वाढीवर मार्गदर्शन केले.
ऍल्युम्नी असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. संजीत देसाई यांनी सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत करताना कायदा विषयाचे प्राध्यापक असलेल्या स्व. डॉ. कार्मो डिसौझा स्मृत्यर्थ या पहिल्या स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान या असोसिएशनला मिळाला या बद्दल अभिमान व्यक्त करुन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्याचे तसेच शिक्षक वर्गाचे आभार मानले.
प्राचार्य डॉ. साबा दा सिल्वा यांनी स्व. डॉ. कार्मो डिसौझा यांची सखोल माहिती उपस्थितांना दिली. डॉ. मारियान पिन्हेरो यांनी या स्पर्धेचे विजेते जाहीर केले तर ऍड. ऍन फुर्तादो यांनी आभार मानले.









