किराणा दुकाने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मिठाई, कापड दुकानांतून मोठय़ाप्रमाणात खरेदी : उलाढाल वाढली
प्रतिनिधी /बेळगाव
बाजारपेठेत नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी पूजनानिमित्त गर्दी झाली होती. दिवाळीच्या साहित्यासाठी सोमवारी सकाळपासूनच नागरिकांची वर्दळ वाढली होती. विशेषतः हार, फुले, फळे, पूजेचे साहित्य, ऊस, नारळ, अंबोती, बत्ताशा आदींना मागणी वाढली होती. त्यामुळे कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा दिवाळीसाठी बाजारपेठ बहरलेली पाहायला मिळाली.
अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱया दिवाळी सणासाठी अबालवृद्धांसह महिला व नोकरदारवर्ग खरेदीसाठी बाहेर पडले होते. त्यामुळे किराणा दुकाने, इलेक्ट्रॉनिक, मिठाई आणि कापड दुकानांतून गर्दी दिसून आली. विशेषतः लक्ष्मी पूजनासाठी झेंडूची फुले, ऊस, अंबोती आणि केळीच्या झाडांची मोठय़ा प्रमाणात खरेदी झाली. विशेषतः गणपत गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड, काकतीवेस रोड, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, कडोलकर गल्ली, पांगुळगल्ली आदी भागात नागरिकांची वर्दळ वाढली होती.
यंदा सण-उत्सव मोठय़ा उत्साहात
मागील दोन वर्षांत कोरोनामुळे सण-उत्सवांवर मर्यादा आल्या होत्या. मात्र, यंदा सण-उत्सव मोठय़ा उत्साहात साजरे केले जात आहेत. गणेशोत्सव, दसरा आणि त्यानंतर आता दिवाळी उत्साहात साजरी होत आहे. शुक्रवारी वसुबारसपासून दिवाळीला प्रारंभ झाला आहे. शनिवारी धनत्रयोदशी झाली. बुधवारी पाडवा आणि भाऊबीज होणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱया पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन खरेदीला पसंती दिली
जाते. त्यामुळे दुचाकी शोरुम आणि इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये बुकिंगसाठी गर्दी होत आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या कोरोनानंतर यंदा उलाढालही मोठय़ा प्रमाणात होत आहे.
गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, पांगुळ गल्लीत तोबा गर्दी
आकाशकंदील, दिवे, पणत्या, पूजेचे साहित्य, झेंडुंच्या फुलांची जागोजागी विक्री होताना दिसत होती. विशेषतः झेंडूची आवक वाढली होती. परतीच्या पावसामुळे नागरिकांनी सकाळी आणि दुपारच्या सत्रातच खरेदीला पसंती दिली. त्यामुळे बाजारात सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळाली. ग्रामीण भागासह खानापूर, चंदगड आणि गोव्यातूनही ग्राहक दाखल झाले होते. विशेषतः बाजारात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी चारचाकी वाहनांवर निर्बंध घालण्यात आले होते. गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक आणि पांगुळ गल्लीत तोबा गर्दी झाली होती.









