वर्षाला 1 कोटी 53 लाख भाडे मिळण्याची शक्मयता : भाडेकरुंना गाळय़ांचा ताबा देण्यासाठी हालचालांना वेग
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळय़ांच्या भाडेकराराची मुदत संपल्याने नव्याने भाडेकराराने देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. मागील आठवडय़ात आयोजित करण्यात आलेल्या 254 पैकी 46 गाळय़ांना बोली लागली आहे. आतापर्यंत 147 गाळय़ांसाठी भाडेकरू निश्चित झाले असून या माध्यमातून महापालिकेला वर्षाला 1 कोटी 53 लाख भाडे मिळणे अपेक्षित आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत म्हणजे गाळय़ांच्या माध्यमातून मिळणारा महसूल आहे. अनेक व्यापारी संकुलातील गाळय़ांच्या भाडेकराराची मुदत मार्चमध्ये संपुष्टात आली आहे. त्यामुळे मे आणि जुलैमध्ये 169 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र काही गाळेधारकांनी गाळय़ांचा ताबा देण्यास नकार देऊन भाडेकरार वाढवून देण्यात यावा, अशी मागणी करून न्यायालयात धाव घेतली होती. स्थानिक आणि उच्च न्यायालयात दावे दाखल केल्याने महापालिकेची लिलाव प्रक्रिया न्यायालयाच्या कचाटय़ात अडकली होती. मात्र याचदरम्यान न्यायालयाच्या परवानगीनुसार न्यायप्रविष्ट गाळे वगळून उर्वरित गाळय़ांसाठी लिलाव प्रक्रिया राबविली होती. मात्र न्यायालयीन वाद निर्माण झाल्याने लिलाव प्रक्रियेकडे नागरिकांनी पाठ फिरविली होती. तरीदेखील दोन वेळा आयोजिलेल्या लिलावादरम्यान 101 गाळय़ांसाठी बोली लागली होती.
मागील आठवडय़ात 254 गाळय़ांसाठी लिलाव प्रक्रिया
भाडेकराराला मुदतवाढ देण्यास नकार देऊन फेरलिलाव राबवून गाळे भाडेतत्त्वावर द्यावेत, असा निकाल देऊन न्यायालयाने दावे फेटाळले आहेत. त्यामुळे मागील आठवडय़ात 254 गाळय़ांसाठी लिलाव प्रक्रिया राबविली होती. या लिलावावेळी केवळ 46 गाळय़ांना भाडेकरू मिळाले आहेत. शिवबसवनगर येथील 4 गाळे, कसाई गल्ली, मटण मार्केट, फिश मार्केट आणि बिफ मार्केटमधील 5 गाळे, कोनवाळ गल्ली येथील 1 बकरी शेड, मध्यवर्ती बसस्थानकासमोरील मनपा व्यापारी संकुलातील 4 गाळे, खंजर गल्ली येथील लक्ष्मी मार्केटमधील 7 गाळे व नव्याने निर्माण केलेल्या एपीएमसी रोडशेजारील व्यापारी संकुलातील 23 गाळे तसेच जुना धारवाड रोड येथील दोन गाळय़ांसाठी बोली लावण्यात आली होती. त्यामुळे यापूर्वी झालेल्या लिलावावेळी आणि आता एकूण 147 गाळय़ांना भाडेकरू मिळाले आहेत. या सर्व गाळय़ांच्या माध्यमातून महापालिकेला 1 कोटी 53 लाख रुपये प्रतिवर्षाला भाडे मिळणे अपेक्षित आहे.
बोली न लागलेले गाळे ताब्यात घेणार
भाडेकरुंना गाळय़ांचा ताबा देण्यासाठी मनपाकडून लवकरच पुढील कारवाई हाती घेण्यात येणार आहे. दिवाळी सणानंतर भाडेकरुंना गाळय़ांचा ताबा देण्यासाठी प्रक्रिया केली जाणार आहे. तसेच बोली न लागलेल्या कसाई गल्लीतील फिश मार्केट, मटण मार्केट आणि बिफ मार्केट, खंजर गल्लीतील लक्ष्मी मार्केट, महात्मा फुले मार्केट, टिळकवाडीतील भाजी मार्केट अशा विविध ठिकाणी असलेले गाळे ताब्यात घेण्यासाठी लवकरच कारवाई सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









