दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण, डी कॉक, मधेवेरे यांची फटकेबाजी
वृत्तसंस्था/ होबार्ट
दक्षिण आफ्रिकेला पुन्हा एकदा पावसाचा फटका बसल्याने टी-20 वर्ल्ड कपमधील झिम्बाब्वेविरुद्ध सुपर 12 मधील सामन्यात विजयापासून वंचित रहावे लागले. पावसाच्या व्यत्ययामुळे षटकांची कपात केल्यानंतरही सामना पूर्ण होऊ शकला नसल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. झिम्बाब्वे संघातील वेस्ली मधेवेरे व दक्षिण आफ्रिका संघातील क्विन्टॉन डी कॉक यांनी या रद्द झालेल्या सामन्यात चमक दाखवली.
पावसामुळे दोन तास उशिरा सुरू झालेला हा सामना 9 षटकांचा घेण्याचे ठरविण्यात आले आणि 3 षटकांचा पॉवरप्ले ठेवण्यात आला. चार गोलंदाजांना दोन षटके गोलंदाजी करण्याची मुभा देण्यात आली. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर निर्धारित 9 षटकांत 5 बाद 79 धावा फटकावल्या. पावसाचा पुन्हा व्यत्यय आल्याने द.आफ्रिकेला 7 षटकांत 64 धावा काढण्याचे सुधारित आव्हान देण्यात आले. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विन्टॉन डी कॉकने पावसाचा पुन्हा अडथळा येणार हे लक्षात घेत प्रारंभापासून जोरदार फटकेबाजी केली. केवळ 3 षटकांतच त्यांनी बिनबाद 51 धावा झोडपल्या. डी कॉकने फक्त 18 चेंडूत नाबाद 47 धावा फटकावल्या होत्या. पण द.आफ्रिकेसाठी व्हीलन ठरलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्यानंतर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोघांना प्रत्येकी एक गुण बहाल करण्यात आला.
1992 वनडे विश्वचषक स्पर्धेतील इंग्लंडविरुद्ध सिडनीतील उपांत्य सामन्यातही द.आफ्रिकेला पावसाचा फटका बसल्यामुळे अंतिम फेरी गाठण्याचे त्यांचे स्वप्न भंगले होते. यावेळी त्यांना सुपर 12 फेरीतील पहिल्या सामन्यात विजयाच्या उंबरठय़ावर पोहोचूनही त्यापासून त्यांना वंचित रहावे लागले.
झिम्बाब्वेच्या डावात चौथ्या षटकांत 4 बाद 19 अशा स्थितीनंतर अष्टपैलू मधेवेरेने जोरदार फटकेबाजी करीत 18 चेंडूत नाबाद 35 धावा केल्याने त्यांना 5 बाद 79 धावांची मजल मारता आली. त्याने मिल्टन शुंभाच्या साथीने 60 धावांची भागीदारी केली. 20 चेंडूत 18 धावा करणारा शुंभा शेवटच्या चेंडूवर बाद झाला. 11 धावांवर जीवदान मिळालेल्या मधेवेरेने आपल्या खेळीत 4 चौकार, 1 षटकार मारला तर शुंभाने 2 चौकार मारले. मधेवेरेने रबाडाने टाकलेल्या आठव्या षटकात 2 चौकार, एक षटकारासह 17 धावा वसूल केल्या. रेगिस चकबव्हा 8, सिकंदर रझा शून्य धावांवर बाद झाले तर कर्णधार क्रेग एर्विन 2 धावा काढून बाद झाल्यानंतर सीन विल्यम्स (1) धावचीत झाला. लुंगी एन्गिडीने 2, पार्नेल व नॉर्त्जे यांनी एकेक बळी मिळविला. प्रत्युत्तरात खेळताना द.आफ्रिकेने बिनबाद 24 धावा जमविल्या असताना पावसास सुरुवात झाली. पण थोडय़ा वेळाने खेळ पुन्हा सुरू करण्यात आला. डी कॉकने उद्दिष्ट लवकर गाठण्याच्या हेतूने रिचर्ड एन्गरेव्हाच्या गोलंदाजीवर 4 चौकार फटकावले. पण पुन्हा पाऊस सुरू झाल्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. द.आफ्रिकेचा पुढील सामना 27 रोजी बांगलादेशविरुद्ध तर झिम्बाब्वेचा सामना त्याच दिवशी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः झिम्बाब्वे 9 षटकात 5 बाद 79 ः मधेवेरे नाबाद 35 (18 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), शुंभा 18 (20 चेंडूत 2 चौकार), चकबव्हा 8, एर्विन 2, विल्यम्स 1, अवांतर 15. गोलंदाजी ः एन्गिडी 2-20, पार्नेल 1-6, नॉर्त्जे 1-10. द.आफ्रिका (सुधारित टार्गेट 7 षटकांत 64) ः 3 षटकांत बिनबाद 51 ः क्विन्टॉन डी कॉक नाबाद 47 (18 चेंडूत 8 चौकार, 1 षटकार), तेम्बा बवुमा नाबाद 2, अवांतर 2. गोलंदाजी ः चतारा 0-23, एन्गरेव्हा 0-17, सिकंदर रझा 0-11.










