वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथील कंठीरवा स्टेडियमवर सुरू असलेल्या व्हिवो पुरस्कृत नवव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात युपी योद्धाज संघाने तामिळ थलैवाजचा 41-24 अशा गुणांनी पराभव केला. या स्पर्धेमध्ये यजमान बेंगळूर बुल्स आणि पाटणा पायरेट्स यांच्यातील सामना टाय झाला.
युपी योद्धाज आणि तामिळ थलैवाज यांच्यातील सामन्यात युपी योद्धाजचा चढाईपटू प्रदीप नरवालने पहिल्या काही मिनिटातच 6 गुण मिळविले. प्रो कबड्डी लीगच्या इतिहासामध्ये चढाईवर 1400 गुणांचा टप्पा ओलांडणारा प्रदीप नरवाल हा पहिला कबड्डीपटू ठरला आहे. युपी योद्धाज संघातील प्रदीप नरवाल आणि सुरिंदर गिल हे अव्वल चढाईपटू म्हणून ओळखले जातात. युपी योद्धाज संघाने तामिळ थलैवाजचे पहिल्यांदा सर्व गडी बाद करून 10-5 अशी आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत युपी योद्धाजने ही आघाडी 23-11 अशी वाढविली. सामन्याच्या पूर्वार्धात तामिळ थलैवाजचे दोनवेळा सर्व गडी बाद झाले. पण उत्तरार्धात तामिळ थलैवाज संघाने बऱयापैकी खेळ करत गुण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना 24 गुणांची मर्यादा ओलांडता आली नाही. युपी योद्धाज संघातील बदली चढाईपटू के. रतनने आपल्या सुपर रेडवर युपी योद्धाज संघाला 40 गुणांची मर्यादा पार करण्यास मदत केली. युपी योद्धाज संघाचा या स्पर्धेतील हा तिसरा विजय आहे.

बेंगळूर-पाटणा सामना टाय
बेंगळूर बुल्स आणि पाटणा पायरेट्स यांच्यातील अटीतटीचा सामना अखेर 31-31 असा बरोबरीत राहिला. पाटणा पायरेट्स संघातील सचिनचा खेळ प्रेक्षणीय झाला. सचिनच्या कामगिरीच्या जोरावरच पाटणा पायरेट्सने नवव्या मिनिटाला बेंगळूर बुल्सवर 6-4 अशी आघाडी घेतली होती. 11 व्या मिनिटाला बेंगळूर बुल्सचे सर्व गडी बाद झाल्याने पाटणा पायरेट्सने आपली आघाडी 12-5 अशी वाढविली. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत पाटणा पायरेट्ने बेंगळूरवर 19-10 अशी बढत मिळविली होती. सामन्याच्या उत्तरार्धातील पहिल्याच काही मिनिटांमध्ये भरतने आपल्या चढाईवर पाटणा पायरेट्सचे काही गडी बाद केले. तरीपण पाटणा पायरेट्सने 34 व्या मिनिटापर्यंत 27-20 अशी आघाडी मिळविली होती. 36 व्या मिनिटाला भरतच्या आक्रमक खेळाच्या जोरावर सामन्याचे चित्र पालटले. बेंगळूर बुल्सने पाटणा पायरेट्सचे सर्व गडी बाद केले. सामना संपण्यास एक मिनिट बाकी असताना पाटणा पायरेट्स केवळ 1 गुणाने आघाडीवर होता. पण गुलियाने शेवटच्या क्षणी आपल्या संघाला महत्त्वाचा गुण मिळवून देत हा सामना 31-31 असा बरोबरीत राखला.









