वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मासिक मोबाईल फोनच्या निर्यातीमध्ये भारताने 1 अब्ज डॉलर्सचा टप्पा नुकताच पार केला असल्याची माहिती आहे. मोबाईलच्या निर्यातीमध्ये भारताने 8 हजार 200 कोटी रुपयांच्या उलाढालीची नोंद केली आहे. केंद्र सरकारच्या पीएलआय स्कीम योजनेमुळे अनेक कंपन्यांनी मोबाईल निर्मितीचे कार्य भारतात सुरू केले आहे. त्यामध्ये जागतिक कंपन्यांचाही सहभाग मोठय़ा प्रमाणात दिसून आला. यामध्ये ऍपल आणि सॅमसंग यांनी भारतामध्ये मोबाईल फोनची निर्मिती करण्यावर जोर दिला असून याअंतर्गत मासिक तत्त्वावर पाहता भारताने मोबाईल निर्यातीमध्ये मोठी उपलब्धी प्राप्त केली आहे. सप्टेंबरमध्ये 8 हजार 200 कोटीहून अधिकची मोबाईल निर्यातीची उलाढाल झाली असल्याचेही सांगितले जात असून अशा प्रकारची कामगिरी पहिल्यांदाच झाली आहे, असेही समजते.

इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन यांनी ही माहिती दिली आहे. सरकारच्या पीएलआय योजनेच्या घोषणेनंतर जागतिक स्तरावर ऍपल, सॅमसंग अशा सर्वांनीच मोबाईल निर्मितीवर भारतात भर दिला आहे. आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 60 अब्ज डॉलर्सची निर्यात करण्याचेही लक्ष्य यावेळी मोबाईल उत्पादक कंपन्यांनी ठेवले असल्याचे सांगितले जात आहे. 2020 मध्ये मेक इन इंडियाअंतर्गत स्मार्टफोन निर्मितीकरिता सरकारने पीएलआय योजना जारी केली होती. याचाच फायदा भारतासह जागतिक स्तरावरील कंपन्यांनी घेतला आहे.
4.2 अब्ज डॉलर्सची निर्यात
दुसरीकडे एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मोबाईलफोनची निर्यात ही दुपटीने वाढून 4.2 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. 2021 च्या समान कालावधीमध्ये ही मोबाईल निर्यात 1.7 अब्ज डॉलर्सची झाली होती. डिसेंबर 2021 मध्ये सर्वाधिक निर्यात करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये मोबाईलची निर्यात ही 2021 सप्टेंबरच्या तुलनेत पाहता 200 टक्के अधिक आहे.









