दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक : खुनासाठी वापरलेली तलवार पोलिसांकडून जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
शालेय विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याचा भीषण खून केल्याच्या आरोपावरून दोन अल्पवयीन मुलांसह तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली असून शाळेतील अत्यंत क्षुल्लक भांडणातून खुनाचा हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी यांनी यासंबंधी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. वैयक्तिक व क्षुल्लक कारणातून त्या शाळकरी मुलाचा खून झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱयांनी दिली असून लक्ष्मण यल्लाप्पा होसमनी (वय 19) रा. खनगाव बी. के., ता. बेळगाव याच्यासह दोन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे.
बुधवार दि. 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी शिवाजीनगर, पाचवी गल्ली येथील प्रज्ज्वल शिवानंद करेगार (वय 16) हा जी. ए. हायस्कूलमध्ये दहावीत शिकणारा विद्यार्थी बेपत्ता झाला होता. दुसऱया दिवशी त्याच्या वडिलांनी कॅम्प पोलीस स्थानकात अपहरणाची फिर्याद दाखल केली होती. त्याच दिवशी 20 ऑक्टोबर रोजी दुपारी त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले.
मुचंडीजवळ आमराईत अर्धनग्न अवस्थेत प्रज्ज्वलचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर कॅम्प पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास हाती घेण्यात आला होता. पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी लक्ष्मणसह तिघा जणांना अटक केली असून यापैकी दोघे अल्पवयीन आहेत.
त्यांच्याजवळून खुनासाठी वापरण्यात आलेली तलवार व दगड पोलिसांनी जप्त केले आहेत. अपहरणासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकलही ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. अटक केलेल्या तिघा जणांपैकी दोघे खनगावचे तर आणखी एक जण चंदूरचा असल्याची माहिती मिळाली आहे. लक्ष्मणला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून दोन अल्पवयीन मुलांना बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले आहे.
पोलिसांसमोर गुन्हेगारांना तपासाचे आव्हानच
पंधरा दिवसांपूर्वी सुळेभावी येथे वर्चस्ववादातून भरचौकात दोन तरुणांचा खून करण्यात आला होता. यापाठोपाठ शालेय विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला असून शाळेत मुलांमध्ये घडलेली वादावादी व क्षुल्लक धक्काबुक्कीचे पर्यवसान अपहरण व खुनात घडले आहे. बेळगाव शहर व तालुक्मयात खुनाचे प्रकार वाढले आहेत. अद्याप अनेक खुनांचा तपास लागलेला नाही. बेळगाव पोलिसांसमोर गुन्हेगारांनी तपासाचे आव्हानच उभे केले आहे.









