उचगाव शिवाजी चौकातील घटना, बसचालकाचा निष्काळजीपणा ः दोन दुचाकी-बसचे मोठे नुकसान
वार्ताहर/ उचगाव
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे बस थेट मेडिकल शॉपमध्ये शिरली. नशीब बलवतर म्हणून मेडिकल तसेच चौकातील नागरिकांच्या जीवावरील धोका टळला. दोन दुचाकी तसेच बसचेही मोठे नुकसान झाल्याची घटना शनिवारी सकाळी नऊच्या सुमाराला घडली.
घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी, उचगावला वस्तीला येणारी बस क्रमांक के. ए. 22 एफ 2154 सकाळी पहाटे सहाच्या सुमाराला चालू झाली नाही. सदर बस नादुरुस्त झाल्याने त्याठिकाणीच होती. बसचालक मोहम्मद गौस यांनी मेकॅनिकला बोलावून घेऊन सदर बसची दुरुस्ती करण्यात आली. बस दुरुस्त झाल्यानंतर बस तशीच न्यूट्रलमध्ये चालू ठेवून बसचालक व मेकॅनिकल चहाला गेले. जातेवेळी टायरला दगड लावणे अथवा गाडी बंद करून जाणे, हे शहाणपण त्यांना सुचले नाही. असे न केल्याने काही अंतरावरती बसचालक व मेकॅनिकल जाताच बस उतारीला असल्याने थेट मेडिकलच्या दिशेने शॉपमध्ये घुसली. मात्र मेडिकल शॉपच्या समोर पत्र्याचे शेड असल्याने या शेडला आधळून बस थांबली गेली. नाहीतर थेट मेडिकलमधील सर्व औषधे व दुकानचे फार मोठे नुकसान होऊन या इमारतीलाही धोका झाला असता.
याबरोबरच या ठिकाणी कोणी नागरिक नव्हते. सदर ठिकाणी रोज नागरिकांची रहदारी, वर्दळ सतत असते. पण नेमकी यावेळी तेथे कोणी नव्हते महणून बालबाल बचावले. समोर दोन दुचाकी वाहने होती. या दोन्ही वाहनांना धडक देऊन बस पुढे गेली. त्यामुळे या दोन्ही दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. बसचालकाच्या या हलगर्जीपणामुळे घडलेल्या घटनेने उचगाव बसस्थानकावर नागरिकांतून, प्रवासी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत होता.









