न्यूझीलंडचा 89 धावांनी विजय ः सामनावीर डेवॉन कॉनवेच्या 58 चेंडूत 92 धावा, ऍलेनची फटकेबाजी
वृत्तसंस्था/ सिडनी
आजपासून सुरु झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने यजमान ऑस्ट्रेलियावर 89 धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रारंभी, प्रथम फलंदाजी करताना डेवॉन कॉनवेच्या नाबाद 92 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने 20 षटकात 3 बाद 200 धावा केल्या. यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव 111 धावात गुंडळाला गेला. मिचेल सँटनर आणि टीम साऊदीने प्रत्येकी 3 बळी घेत विजयात मोलाची भूमिका बजावली.
तत्पूर्वी, यजमान ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा लाभ उठवताना किवीज फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. सलामीवीर फिन एलन व डेवॉन कॉनवे यांनी अर्धशतकी सलामी दिली. एलनने अवघ्या 16 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारासह 42 धावा चोपल्या. पण फटकेबाजी करण्याचा प्रयत्नात तो त्रिफळाचीत झाला. हॅजलवूडने त्याला बाद केले. यानंतर डेवॉन कॉनवेने शानदार फलंदाजी करताना 58 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारासह 92 धावा फटकावल्या. कॉनवेच्या या शानदार खेळीमुळे किवीज संघाने 20 षटकांत 3 बाद 200 धावांचा डोंगर उभा केला. कॉनवेला जेम्स नीशम (13 चेंडूत नाबाद 26), केन विल्यम्सन (23) व ग्लेन फिलिप्स (12) यांनी चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून हॅजलवूडने 2 तर झाम्पाने 1 बळी घेतला.
ऑसी फलंदाजांची हाराकिरी
न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 201 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 17.1 षटकांत 111 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 28 धावा फटकावल्या. पॅट कमिन्सने 21 तर मिचेल मार्शने 16 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केल्यामुळे ऑसी संघाला 89 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडकडून टीम साऊथीने अवघ्या 6 धावांत 3 बळी घेत विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली. मिचेल सँटनर 31 धावांत 3, ट्रेंट बोल्ट 2 तर फर्ग्युसन व ईश सोधी यांनी एकेक बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड 20 षटकांत 3 बाद 200 (फिन एलन 42, डेवॉन कॉनवे नाबाद 92, नीशम नाबाद 26, विल्यम्सन 23, हॅजलवूड 41 धावांत 2 बळी, झाम्पा 39 धावांत 1 बळी).
ऑस्ट्रेलिया 17.1 षटकांत सर्वबाद 111 (मॅक्सवेल 28, पॅट कमिन्स 21, फिंच 13, मिचेल मार्श 16, टीम डेविड 11, टीम साऊथी 6 धावांत 3 बळी, सॅटनर 31 धावांत 3 बळी, ट्रेंट बोल्ट 24 धावांत 2 बळी).

टीम साऊथीचे आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक बळी
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीने 6 धावांत 3 बळी घेत ऑसी फलंदाजीचे कंबरडे मोडले. या कामगिरीसह तो आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. साऊथीच्या खात्यावर सध्या 101 सामन्यात 125 बळींची नोंद आहे. साऊदीने हा विक्रम करताना बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याला मागे टाकले आहे. शाकीबने आतापर्यंत 104 सामन्यात 122 बळी घेतले आहेत. या यादीत अफगाणच रशीद खान 118 बळीसह तिसऱया स्थानावर आहे.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
125 – टीम साऊथी (न्यूझीलंड)
122 – शकीब अल हसन (बांगलादेश)
118 – रशीद खान (अफगाणिस्तान)
107 – लसिथ मलिंगा (श्रीलंका)
104 – ईश सोधी (न्यूझीलंड).
कॉनवेकडून कोहलीचा विक्रम मोडीत, बाबर आझमच्या विक्रमाशी बरोबरी
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा करण्याचा हा विराटच्या नावावर होता. विराट कोहलीने 27 डावात हा टप्पा गाठला होता. परंतु आज कॉन्वेने 26 डावात हा पल्ला पार केला आहे. त्याने विराटपेक्षा एक डाव कमी घेत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला आहे.
तसेच कॉनवेने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. बाबर आझमने टी-20 क्रिकेटमध्ये 26 डावात 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. या विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा फलंदाज इंग्लंडचा डेव्हिड मलान आहे. या डावखुऱया फलंदाजाने अवघ्या 24 डावांत ही कामगिरी साकारली आहे.
टी-20 मध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारे फलंदाज
डेव्हिड मलान – 24 डाव
डेवॉन कॉनवे – 26 डाव
बाबर आझम – 26 डाव
विराट कोहली – 27 डाव
ऍरॉन फिंच – 29 डाव
केएल राहुल – 29 डाव.









