प्रतिनिधी / बेळगाव :
मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकार्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून विविध विषयांवर चर्चा केली. 1 नोव्हेंबर रोजी सीमाभागात म. ए. समितीच्यावतीने काळादिन पाळला जातो. या दिवशी होणार्या मूक सायकल फेरी व जाहिर सभेसाठी महाराष्ट्र सरकारने प्रतिनिधी पाठवून द्यावे, अशी मागणी केली. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रतिनिधी पाठवून देण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयातील दावा लवकरात लवकर सुरु होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करावेत, उच्चाधिकार व तज्ज्ञ समितीची बैठक बोलावून सविस्तर चर्चा करावी, मुंबईतील सीमा कक्षात वरिष्ठ अधिकारी व कर्मचार्यांची ताबडतोब नेमणूक करावी तसेच महाराष्ट्राचे दिल्ली येथील वकील अॅड. शिवाजीराव जाधव यांनी ज्येष्ठ वकील नेमणुकीत संदर्भात पाठविलेल्या पत्राची दखल घेवून त्वरीत कार्यवाही करावी, अशी मागणी मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी फोनवरून मुख्यमंत्र्यांकडे केले.
सीमावासियांच्या व्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाणून घेत काळा दिनी होणार्या जाहिर सभेसाठी प्रतिनिधी पाठवून देवू तसेच उर्वरित सर्व मागण्या देखील लवकर पूर्ण करू, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. त्यामुळे सीमावासियांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.