सीसीबीची कारवाई, दोघा जणांना अटक
प्रतिनिधी / बेळगाव
ऑटोनगर परिसरात अफीम विकणाऱया दोन तरुणांना अटक करून त्यांच्याजवळून 2 लाख 70 हजार रुपये किमतीचे 315 ग्रॅम अफीम जप्त करण्यात आले आहे. सीसीबीच्या अधिकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबीचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील, एच. एस. निसुण्णवर, एस. बी. पाटील, एम. एम. वडेयर, एस. एम. बजंत्री, वाय. डी. नदाफ आदींनी ही कारवाई केली. रोहिताश्वर भगवानराम बिष्णोई (वय 24, मूळचा रा. जोधपूर, राजस्थान, सध्या रा. एम. के. हुबळी), राजकुमार जुगतराम बिष्णोई (वय 22, मूळचा रा. जोधपूर, सध्या रा. रुक्मिणीनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याजवळून एक कार, दोन मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत. सीईएन पोलीस स्थानकात त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









