कर्नाटकातील ज्येष्ठ आणि एकनिष्ठ काँगेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँगेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक अगदी सहजगत्या जिंकली आहे. आपले प्रतिस्पर्धी खासदार शशी थरुर यांचा त्यांनी प्रचंड बहुमताने पराभव केला. खरे तर ही लढत चुरशीची नव्हतीच. खर्गे यांचा विजय त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यापासूनच निश्चित मानला जात होता. कारण काँगेसवर आजवर या ना त्या नात्याने अधिराज्य गाजवलेले गांधी कुटुंब वरकरणी जरी या निवडणुकीपासून अलिप्त असल्याचे भासवत होते, तरी थरुर यांच्यापेक्षा खर्गे यांच्याकडे काँगेसच्या या ‘प्रथम कुटुंबा’चा कल होता आणि त्यांचा ‘चॉईस’ पराभूत होणे शक्यच नव्हते. या निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँगेसचे अध्यक्ष होतील असे वातावरण होते. तथापि, ते राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी कोण, हा प्रश्न काँगेस श्रेष्ठींना राजस्थान काँगेसमधील सर्व गटतटांचे समाधान होईल अशा प्रकारे सोडविता न आल्याने गेहलोत यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अर्ज भरण्यापूर्वीच माघार घेतली. खर्गे यांनी अगदी ऐनवेळी रिंगणात प्रवेश केला. प्रारंभापासून त्यांचे नाव तसे आघाडीवर नव्हते. पण ही निवडणूक होण्यापूर्वीच राजस्थान काँगेसमध्ये जे घमासान माजले, ते पाहता खर्गे यांचा विजय सहजगत्या झाला असला तरी त्यांची पुढची वाट सोपी नाही, याची प्रचीती त्यांना ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्यापूर्वीच आली आहे. त्यांच्यासमोर अ आव्हानांचा डोंगरच उभा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरु नये. काँगेस पक्षाची सध्याची राजकीय अवस्था दयनीय म्हणावी अशीच आहे. मात्र, ही दयनीयता केवळ या पक्षाचा विविध निवडणुकांमध्ये सातत्याने पराभव होत आहे, म्हणून जशी निर्माण झालेली आहे, त्यापेक्षा अधिक प्रमाणात ती पक्षनेतृत्वावरील विश्वासाच्या अभावापोटी निर्माण झालेली आहे असे दिसून येते. आज काँगेसला जसे आणि जितके पराभव सहन करावे लागत आहेत, त्याहीपेक्षा जास्त पराभवांना एकेकाळी जनसंघ आणि भाजप यांना तोंड द्यावे लागत होते. तथापि, त्या पक्षामध्ये कार्यकर्ते आणि नेते यांच्यात विश्वासाची दरी कधी निर्माण झाली नव्हती. त्यामुळे टप्प्याटप्प्याने प्रथम जनसंघ आणि नंतर त्याचाच काही बदलांसह अवतार असणाऱया भाजपने भारताच्या राजकारणात आपले स्थान निर्माण केले आणि आता तर हा पक्ष मध्यवर्ती स्थान मिळवण्यात यशस्वी झालेला आहे. काँगेससाठी आणि विशेषतः खर्गे यांच्यासाठी हे उदाहरण महत्त्वाचे आहे. कोणताही पक्ष केवळ निवडणुकीत पराभव होत आहेत म्हणून रसातळाला जात नाही. पण कार्यकर्त्यांच्या आणि हितचिंतकांच्या मनात पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वासंदर्भात विश्वास राहिला नसेल तर मात्र, पक्ष कितीही मोठा आणि यशस्वी असला तरी त्याचे भवितव्य धूसरच असते. गेल्या तीन चार वर्षांमध्ये काँगेसमधून घावूक पक्षांतरे घडली. त्यातून कर्नाटक आणि मध्यप्रदेशात सत्ता गमवावी लागली. हे सर्व विश्वासाच्या अभावापोटीच घडत आहे. कार्यकर्त्यांच्या नेतृत्वावरील विश्वासाची कमतरता ही एकमेव समस्या नाही, तर मतदारांचाही त्या पक्षावर पुरेशा प्रमाणात विश्वास उरलेला नाही, ही खरी आणि पायाभूत समस्या आहे. तेव्हा खर्गे यांना मतदार, कार्यकर्ते आणि पक्षाचे नेतृत्व यांच्यात पुन्हा समन्वय आणि विश्वास निर्माण करावा लागणार असून तेच सर्वात मोठे आणि जटील आव्हान आहे. ते त्यांनी पार केले तरच काँगेसला गतवैभव पुन्हा प्राप्त होऊ शकते. खर्गे अध्यक्ष होऊन दोन महिने होण्याच्या आतच त्यांना गुजरात आणि हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचे नेतृत्व करावे लागणार. गुजरात हा एकेकाळी काँगेसचा बालेकिल्ला होता. हिमाचल प्रदेश हा प्रत्येक विधानसभा निवडणुकीत आलटून पालटून भाजप आणि काँगेसकडे असतो. या दोन राज्यांमध्ये काँगेसची कामगिरी कशी होते, यावर खर्गे यांच्या नेतृत्वक्षमतेची योग्यता ओळखली जाणार हे निश्चित आहे. पण खरे आव्हान त्यानंतर पाच महिन्यांनी त्यांच्या गृहराज्यात, अर्थात कर्नाटकात होईल. कारण मे 2023 मध्ये तेथे विधानसभा निवडणूक होईल. ती पक्षाला जिंकून देणे हा खर्गे यांच्यासाठी अटीतटीचा मामला असेल. या आव्हानात ते यशस्वी झाले तर काँगेसमध्ये त्यांचे स्थान निश्चितपणे बळकट होईल आणि पुढची वाट कदाचित सोपी होईल. तथापि, कर्नाटकात त्यांना अपयश आले, तर मात्र, त्यांचा ‘सीताराम केसरी’ होण्यास वेळ लागणार नाही. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खरे तर राहुल गांधी उमेदवार नव्हते. तरीही, मतपत्रिकेवर त्यांचे नाव लिहून मत टाकण्याचा प्रकार 400 हून अधिक काँगेस पदाधिकाऱयांनी केला. ही खरेतर खर्गे यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. आजही काँगेसमध्ये काही पदाधिकाऱयांना गांधी कुटुंबातील व्यक्तीच अध्यक्षस्थानी हवी आहे, हे स्पष्ट आहे. खर्गे यांचे कोणतेही अपयश काँगेसमधील हा गट अधिक बळकट करणार यात संशय नाही. उत्तर प्रदेश या भारतातील सर्वात मोठय़ा राज्यात विधानसभा निवडणुकीत काँगेसला अवघ्या दोन जागा आणि सव्वादोन टक्के मते मिळाली. तसेच पंजाब गमावला. उत्तराखंडमध्ये यश मिळण्याची शक्यता असूनही ते हाती आले नाही. एका हिशेबानुसार 2014 पासून देशात झालेल्या 49 मोठय़ा निवडणुकांपैकी काँगेसने 39 गमावल्या आहेत. खर्गे यांची झोप उडावी अशीच ही स्थिती नाही काय? अर्थात, त्यांची निष्ठा, पक्षप्रेम, व्यक्तीगत प्रतिमा आणि सर्वसमावेशक स्वभाव या गुणांसंबंधी कोणालाही शंका नाही. वयाच्या 80 व्या वर्षीही त्यांची कार्यशक्ती वाखाणण्यासारखी असून ती जमेची बाजू आहे. त्यांनी लढविलेल्या 12 मोठय़ा निवडणुकांपैकी 11 त्यांनी जिंकलेल्या आहेत. त्यामुळे व्यक्तीगत यशही निर्विवाद म्हणावे असेच आहे. ते स्वतःच्या क्षमतांचा उपयोग पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी कसा करतात हे येणारा काळच ठरवेल. आव्हाने मोठी आणि वेळ थोडा अशा परिस्थितीत ते कशी वाट काढतात आणि पक्षाचे भरकटलेले तारु कसे सावरतात हे दिसेलच. मल्लिकार्जुन खर्गे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
New Delhi: Newly elected Congress President Mallikarjun Kharge flashes the victory sign during a press conference, at his residence in New Delhi, Wednesday, Oct. 19, 2022. Out of the total 9,385 votes, Kharge received 7,897 while his opponent, Shashi Tharoor garnered 1,072 votes. A total of 416 votes have been counted as invalid. (PTI Photo/Shahbaz Khan)(PTI10_19_2022_000206B)







