खड्डा बुजविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय
प्रतिनिधी / बेळगाव
कॅन्टोन्मेंट परिसरातील विविध ठिकाणी असलेले खड्डे बुजविण्यात आले आहेत. मात्र पोस्टमन चौकात असलेला एकमेव खड्डा बुजविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. मुख्य पोस्ट कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर असलेला हा खड्डा वाहनधारकांसह पादचाऱयांना अपघातास आमंत्रण देत आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटचे अभियंते याकडे लक्ष देतील का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
कॅन्टोन्मेंट परिसरातील खड्डय़ांबाबत सातत्याने तक्रारी करण्यात येत आहेत. विविध ठिकाणी असलेले रस्ते खराब झाले आहेत. नागरिकांना पाणी, पथदीप, रस्ते अशा नागरी सुविधा पुरविण्यात कॅन्टोन्मेंट बोर्ड अपयशी ठरले आहे. निधी नसल्याचे सांगून समस्यांचे निवारण करण्याकडे कानाडोळा करण्यात आला आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. पोस्टमन चौकातील रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. तसेच स्टेशन रोडदेखील मागील काही वर्षांपासून दुर्लक्षित होता. पण सहा महिन्यांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र पोस्ट कार्यालयासमोरील खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष केले आहे. हा चौक कॅन्टोन्मेंट बोर्डकडे असल्याचे सांगून रेल्वे खात्याने केवळ रस्त्याचे डांबरीकरण करून चौकातील रस्त्याकडे कानाडोळा केला आहे.
कॅन्टोन्मेंट-रेल्वे खात्याच्या बेजबाबदारपणाबद्दल संताप
मुख्य पोस्टमन कार्यालयासमोर असलेला खड्डा वाहनधारकांना धोकादायक बनला आहे. पोस्ट कार्यालयातून बाहेर पडताच थेट खड्डय़ात पडण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. हा खड्डा खूपच मोठा झाला असून दुचाकी वाहनधारकांनाही अपघातास निमंत्रण देत आहे. कॅन्टोन्मेंट आणि रेल्वे खात्याच्या बेजबाबदारपणाबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. येथील खड्डा बुजविण्यासाठी कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱयांनी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.