;
प्रतिनिधी / सोलापूर
पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून कोयत्याने 15 वार करून तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास घडली.
वैकाटूचामी ऊर्फ कल्याणी काटाराजा देवर (वय 31, रा. सुनीलनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत राजेशकन्न्न काटाराजा देवर (वय 34, रा. gसुनीलनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कामाची देवर, शिवा देवर (रा. सुनील नगर) यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि आरोपी हे मूळचे तमिळनाडू राज्यातील रहिवासी आहेत. सोलापूर शहर तसेच जिह्यात पापड तयार करून विक्रीचे काम करतात. मागील 40 वर्षांपासून त्यांचा सोलापूर परिसरात मुक्काम आहे. आरोपी कामाची याच्या पत्नीबरोबर कल्याणी नेहमी फोनवरून बोलत होता. तसेच त्यांच्या घरीही जात असल्याचे सांगण्यात आले. त्यावरून आरोपी आणि कल्याणी यांच्यात वाद झाला होता.
दरम्यान, रविवारी रात्री आरोपी कामाची आणि कल्याणी यांच्यात फोनवरून शाब्दिक वाद झाला. त्यानंतर कल्याणी घरातील दुचाकीवरून सुनील नगरातील शिवशक्ती चौकाजवळ आरोपीने बोलाविलेल्या ठिकाणी गेला होता. त्याठिकाणी आरोपी आणि त्याचे साथीदार असे चौघेजण थांबले होते. कल्याणी दुचाकीवर बसून बोलत असतानाच, आरोपींनी त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा आरोपी कामाचीने पिशवीत आणलेला कोयता काढून कल्याणीच्या डाव्या डोळ्याजवळ वार केला. तसेच अंगावरही वार केले. तेव्हा आरोपी शिवाने कोयता कामाचीच्या हातातून घेऊन कल्याणीच्या पायावर जोराने हल्ला केला. यानंतर आरोपी तेथून पळून गेले.
जखमी अवस्थेत फिर्यादीने कल्याणी याला शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले. परंतु उपचारादरम्यान पहाटे कल्याणी मृत पावला. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार कल्याणीने कामाची आणि त्याच्या पत्नीला लाख रुपये आणि दोन तोळे सोने दिले होते. ते परत मागण्यासाठी अनेकवेळा कल्याणी फोन करत होता. त्यावेळी कामाचीने दोन तोळे दागिने देतो, पैसे मात्र पत्नीकडून घे असे सांगितले होते. यामुळे कल्याणीचे आरोपीच्या पत्नीबरोबर वारंवार बोलणे होत होते असे सांगितले. याच कारणातून आरोपींना संशय आला आणि त्यांनी कल्याणीला संपवल्याचे तो म्हणाला. पोलीस उपनिरीक्षक अनिल वळसंगे तपास करीत आहेत.
शहराच्या प्रतिमेवर परिणाम
मागील काही दिवसांमध्ये परप्रांतीयांमध्ये भांडणे होऊन दोन खून पडले तर अनैतिक कारणातूनही एक खून झाला होता. किरकोळ कारणातून चाकूने भोसकून तळेहिप्परगा परिसरात तरुणाचा खून झाल्याच्या घटनेला 15 दिवसांचाही काळ लोटला नाही. तोपर्यंत आणखी एक प्रकरण उघडकीस आले. यात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला मारल्याची घटना घडली. रविवारी अनैतिक संबंधातून तरुणाचा खून झाली ही तिसरी घटना घडली. काही दिवसांच्या अंतराने होणाऱया अशा घटनांचा शहराच्या प्रतिमेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.