आम आदमी पार्टीचा इशारा; ‘कोरोना’त सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मानधन दीवाळीपूर्वी द्यावे; जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर
कोल्हापूर प्रतिनिधी
कोरोनाच्या कालावधित कोविड हॉस्पिटल व कोविड सेंटरमध्ये सेवा बजावणार्या कंत्राटी आरोग्य सेवकांचे थकित मानधन दीवाळीपूर्वी जमा करावे, अन्यथा पालकमंत्र्यांसह जिह्यात येणार्या मंत्र्यांच्या गाडय़ा अडवून भिकमांगो आंदोलन केले जाईल, असा इशारा आम आदमी पार्टीतर्फे सोमवारी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला देण्यात आला.
जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री दीपक केसरकर, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठवावयाचे निवेदन सादर केले.
निवेदनात म्हंटले आहे की, कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून काम करणार्या कंत्राटी आरोग्य सेवकांचे मानधन गेल्या 14 महिन्यांपासून मिळालेले नाही. यासाठी सातत्याने प्रशासन व शासन पातळीवर पाठपुरावा सुरु आहे. परंतु यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. एका बाजूला या कर्मचार्यांचा कोविड योध्दा म्हणून जनता सन्मान करत आहे, तर दुसर्या बाजूला शासन त्यांचे मानधन थकवून अन्याय करत आहे. त्यामुळे मंत्रालयस्तरावर याचा गांभिर्यपूर्वक विचार करुन त्यांचा थकित पगार दीवाळीपूर्वी द्यावा. दीवाळीपूर्वी जर हे पैसे जमा झाले नाहीत तर जिह्यातील मंत्र्यांच्या घरासमोर तसेच पालकमंत्री व जिह्यात दौर्यावर येणार्या मंत्र्यांच्या गाडय़ा अडवून कटोरा घेऊन भिक मांगो आंदोलन केले जाईल, याची नेंद घ्यावी. शिष्टमंडळात उत्तम पाटील, रवींद्र राऊत, मयूर भोसले, ऋषिकेश वीर, सचिन कुडतरकर, समीर लतीफ, शशांक लोखंडे, सचिन कांबळे, किशोर खाडे, अभिजीत आंबले आदींचा समावेश होता.