राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलला केवळ तीन जागा
मेढा: भणंग, ता. जावली येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मच्छिंद्रनाथ क्षीरसागर यांच्या पाडळेश्वर पॅनेलला मतदारांनी नाकारले असून थेट सरपंचपद आणि सदस्यपदाची माळ मतदारांनी अपक्षांच्या गळ्यात घातली आहे. सत्ताधारी पाडळेश्वर पॅनेलला केवळ तीनच जागांवर समाधान मानावे लागले. थेट सरपंचपदी गणेश साईबाबा जगताप हे प्रचंड मतांनी विजयी झाले.
या ग्रामपंचायतीसाठी रविवारी ८३ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढल्यामुळे सत्ताधारी पॅनेलला दणका बसणार हे निश्चित झाले होते. आज सोमवारी मेढा येथे या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यावेळी थेट सरपंचपदासाठी उभे असलेले उमेदवार गणेश साईबाबा जगताप यांनी ४२० मते मिळवून सत्ताधारी पॅनेलचे माजी सरपंच सुहास रामचंद्र जाधव यांचा पराभव केला. सुहास जाधव यांना ३४९ मते मिळाली. सदस्यपदासाठी झालेल्या निवडणुकीत वार्ड क्रमांक एकमधून अपक्ष उमेदवार संगीता सत्यवान जाधव यांनी २०३ मते मिळवून पाडळेश्वर ग्रामविकास पॅनेलच्या शितल प्रशांत जाधव यांचा पराभव केला. प्रभाग क्रमांक दोनमधून पाडळेश्वर ग्रामविकास पॅनेलचे विकास रमेश देशमुख, श्रीमती रंजना नारायण जाधव, सौ. मथुरा नारायण जाधव या विजयी झाल्या. अपक्ष उमेदवार अक्षय सत्यवान जाधव हे केवळ तीन मतांनी पराभूत झाले.
वार्ड क्रमांक तीनमधून सचिन देवानंद भोसले यांनी १३९ मते मिळवून जितेंद्र भिकू जगताप या सत्ताधारी पॅनेलच्या उमेदवाराचा केवळ आठ मतांनी पराभव केला. श्रीमती हाफीजा जमाल मोमीन या अपक्ष उमेदवार या प्रभागातून विजयी झाल्या. सत्ताधारी पॅनेलच्या उमेदवार व माजी सदस्या प्रतिभा प्रमोद पंडित यांना या प्रभागातून केवळ ११७ मध्ये मिळाली. त्या चौथ्या क्रमांकावर गेल्या. या निवडणुकीत यापूर्वीच रमेश गाडे हे अपक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत.
उपसरपंचपदाकडे सर्वांचे लक्ष
सत्ताधारी पॅनेलचे प्रचार प्रमुख व जिल्हा परिषदेचे सदस्य मच्छिंद्रनाथ क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत तर तीन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. यापूर्वीच एक जण बिनविरोध निवडून आला आहे. त्यामुळे उपसरपंच निवडीच्या चाव्या आता अपेक्षांच्या हातात आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी पाडळेश्वर पॅनेलने आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा फोटो प्रचार पत्रिकेवर प्रसिद्ध केला होता. त्यामुळे या पॅनेलला भाजप पुरस्कृत पॅनेल असेच मतदारांनी मानले. सरपंच गणेश जगताप यांनी अपक्ष म्हणून थेट सरपंचपदाची निवडणूक लढवली. त्यांनी व त्यांच्या अपक्ष सहकार्यांनी एकमेकांना साथ देत कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर अथवा वलय वापरले नाही. हे सर्व उमेदवार स्वतःच्या व्यक्तिगत ताकतीवरती निवडून आले आहेत. त्यामुळे हे सर्व उमेदवार भविष्यात आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करू शकतील, असा अंदाज सध्या तरी व्यक्त केला जात आहे. सरपंच गणेश जगताप यांनी सध्या तरी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे या निवडणुकीत भणंग ग्रामपंचायत कोणत्या पक्षाच्या ताब्यात गेली, हे सध्या तरी गुलदस्त्यातच आहे.
उपसरपंच निवडीपूर्वी राजकारणात मात्तब्बर असलेले मच्छिंद्रनाथ क्षीरसागर अपक्षांची मोट बांधण्यात यशस्वी झाल्यास त्यांच्या गटाचा उपसरपंच सहजरित्या होवू शकतो, पण सरपंच गणेश जगताप हे आपल्या सोबत असलेल्या अपक्षांना कसं रोखून ठेवतात, यावरच पुढची गणिते आहेत.