ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घ्यावी, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पत्राद्वारे केले आहे. उमेदवारी मागे घेण्यावर खुद्द भाजपचे उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी प्रतिक्रीया दिली आहे. मी अंधेरीतला छोटा कार्यकर्ता आहे. राज ठाकरेंच्या पत्राबद्दल मला माहिती नाही. पक्षाचे वरिष्ठ यासंदर्भात जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे पटेल यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रीया देताना पटेल म्हणाले, राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेलं पत्र मी बघितलेलं नाही. मी प्रचारातच होतो. आमचे वरिष्ठ नेते त्याबद्दल बोलतील. मी बोलणं बरोबर ठरणार नाही. मी अंधेरीचा एक छोटा कार्यकर्ता आहे. अंधेरीमध्येच काम करतो. वरच्या लेव्हलला काय सुरु आहे मला माहिती नाही. यावेळी भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि आठवलेंची आरपीआय या तिन्ही पक्षांची युती असून ती भक्कम आहे, असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अधिक वाचा : अन्याय होत असेल तर खडसेंनी कोर्टात जावं
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सचिव सी.टी. रवी आज मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज ‘वर्षा’ बंगल्यावर यासंदर्भात बैठक होणार आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजप उमेदवार माघार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.