लोणावळा / प्रतिनिधी :
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) राज्यातील शेतीविषयक समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आले असून, मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने रविवारी त्यांची भेट घेतली. मुख्यत्वे कृत्रिम फुलांवर बंदी घालण्यात यावी तसेच पॉलिहाऊस उभारणीची मर्यादा किमान पाच एकरपर्यंत करण्यात यावी, यासह विविध मागण्या या शिष्टमंडळाकडून करण्यात आल्या.
या शिष्टमंडळात मावळातील शेतकरी मुकुंद ठाकर, ज्ञानेश्वर आडकर दिलीप काळे, तानाजी शेंडगे, चंद्रकांत कालेकर, हेमंत कापसे, जयसिंग हुलावळे, ज्ञानेश्वर ठाकर, रामदास पवार यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाशी तोमर यांनी चर्चा केली. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन कृषिमंत्र्यांना सादर करण्यात आले. मावळ तालुक्यात गुलाब फुलांसाठी पोषक वातावरण असल्याने या फुलांच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच कृषी आयुक्त धीरज कुमार यांना शेतकऱ्यांच्या समस्या थेट बांधावर जाऊन समजून घ्या व कृषी मंत्रालयात समस्या सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना तोमर यांनी दिल्या. या वेळी कृषी संचालक डॉ. कैलास मोते, दिलीप झेंडे, विकास पाटील, दशरथ तांबोळी, अतिरिक्त प्रकल्प संचालक ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष काटकर, कृषी उपसंचालक विजय कानडे, मावळ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय पडवळ हे उपस्थित होते.
अधिक वाचा : सरकारमधील मंत्र्यांना सत्तेचा माज; त्यांना शेतकऱ्यांशी देणंघेणं नाही
पुष्पोत्पादनाकरिता सवलती हव्यात
मावळ तालुका मागील काही वर्षांपासून फुलांचा तालुका म्हणून ओळखला जातो. गुलाब फुलांच्या सोबतच विविध रंगाची व आकारांची इतर फुले येथे उत्पादित केली जातात. राज्यातील एकूण फुल उत्पादनात मावळचा वाटा सर्वाधिक आहे. व्हॅलेंटाइन डेला मावळातील गुलाब फुलांना खूप मागणी असते. सोबतच वर्षभर विविध सामाजिक व धार्मिक सोहळय़ांसाठी व इतर कार्यक्रमांसाठी बाजारपेठेत येथून फुलांची निर्यात केली जाते. असे असले, तरी फुल उत्पादन हा निसर्गलहरी व्यवसाय बनला आहे. याकरिता शासकीय अनुदान व सवलती मिळणे गरजेचे असल्याचे मत पवना फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष व प्रगतशील शेतकरी मुकुंद ठाकर यांनी व्यक्त केले.