3 नोव्हेंबरपासून होणार सहामाही
प्रतिनिधी/ बेळगाव
दसरा सुटीनंतर सोमवार दि. 17 पासून शाळा पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. 14 दिवसांनंतर शाळा सुरू होणार असल्याने शनिवारी काही प्राथमिक शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जाऊन सोमवारपासून शाळेत दाखल होण्याच्या सूचना करीत होते.
यावषी दि. 3 ते 16 ऑक्टोबरदरम्यान दसरा सुटी देण्यात आली. शिक्षक संघटना तसेच काही विधानपरिषद सदस्यांनी दसरा सुटी वाढवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. परंतु आधीच मागील दोन वर्षांत विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान पाहून सोमवार दि. 17 पासूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 14 दिवसांच्या सुटीनंतर पुन्हा एकदा शाळा गजबजणार असल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांकडून तयारी करण्यात येत होती.
शनिवारी प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांमधील शिक्षक शाळांवर दाखल झाले. शाळेच्या स्वच्छतेसोबतच विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन सूचना केली जात होती. दसरा सुटीदरम्यान दिलेला गृहपाठ पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होती. त्यामुळे दसरा सुटीनंतर पुन्हा एकदा शाळा गजबजणार आहेत.
3 नोव्हेंबरपासून सहामाही
दसरा सुटीनंतर सोमवार दि. 17 पासून प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या सहामाही परीक्षा होणार होत्या. परंतु शिक्षण विभागाने शनिवार दि. 15 रोजी एक अध्यादेश बजावला असून दिवाळीनंतर परीक्षा घेण्याची सूचना करण्यात आली आहे. दि. 3 ते 10 नोव्हेंबर दरम्यान परीक्षा घ्याव्यात, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.









