वृत्तसंस्था/ लेह (लडाख)
भारतामध्ये इतर क्रीडा प्रकारांच्या तुलनेत क्रिकेटला सर्वाधिक प्राधान्य मिळत असून चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामध्ये महिलांचाही अपवाद नाही. देशातील अनेक क्रिकेटपटू राष्ट्रीय संघामध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात. बऱयाच खेळाडूंचे हे स्वप्न साकार होते तर काही जणांची निराशा होते. लडाखमधील सहाव्या इयत्तेत शिकणारी विद्यार्थिनी मक्सूमा ही क्रिकेटची वेडी असून विराट कोहलीची चाहती आहे.
मक्सूमाने आपल्या बालपणापासूनच क्रिकेटचा सराव सुरू केला आहे. नियमितपणे फलंदाजी आणि गोलंदाजीचा ती काही तास सराव करते. लडाखच्या शालेय शिक्षण विभागातर्फे मक्सूमाच्या क्रिकेट सरावाचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. मक्सूमला तिच्या आईवडिलांकडून तसेच शालेय शिक्षकांकडून क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. भारतीय संघातील अव्वल फलंदाज विराट कोहलीच्या फटके मारण्याची शैली अवगत करण्यासाठी मक्सूमाचे प्रयत्न चालू आहेत. विराटप्रमाणेच ती आता फटकेबाजीची नक्कल करू लागली आहे. माजी कर्णधार धोनीचा हेलिकॉप्टर शॉट मारण्यासाठीही तिचे प्रयत्न सुरू आहेत. क्रिकेटचा सराव सातत्याने करण्याचा मनोदय तिने व्यक्त केला असून भविष्यकाळात भारतीय महिला क्रिकेट संघात स्थान मिळविणे हे आपले लक्ष्य राहील, असेही विराटची चाहती मक्सूमाने म्हटले आहे.









