दहशतवाद्यांचा कट फसला, बॉम्बशोधक पथकाने स्फोटके केली निकामी
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या बांदिपोरा जिह्यात शनिवारी सकाळी आयईडी स्फोटकांचा मोठा साठा सापडला. स्फोटकांची माहिती मिळताच बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी पोहोचून ती निकामी केली. यादरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून रस्त्यावरील वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. सणासुदीच्या काळात दहशतवादी मोठा हल्ला करण्याचा कट आखत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
बांदिपोरा-सोपोर मार्गावर बडियारा आणि कंबाठी गावांदरम्यान दोन गॅस सिलिंडरसह सुमारे 15-16 किलो स्फोटके सापडल्यानंतर पोलीस, लष्कर आणि बॉम्बशोधक विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. स्फोटके जिवंत असल्याची खात्री झाल्यानंतर बॉम्बनाशक पथकाने ती निकामी केली. यापूर्वी 13 ऑक्टोबर रोजी रामबन जिह्यातील गुल तहसीलमध्ये 3 आयईडी, अनेक दारूगोळा आणि स्फोटक सामग्री जप्त करण्यात आली होती. तसेच 8 ऑक्टोबर रोजी कठुआ जिह्यातील बिल्लावर परिसरातून आणि 2 ऑक्टोबर रोजी कठुआ येथेही मोठी कारवाई करण्यात आली होती.









