दक्षिण दिल्लीमध्ये दोन ऐतिहासिक विहिरींचा शोध लागला आहे. या विहिरींमधील पाणी औषधी असून त्यामुळे विविध प्रकारचे चर्मरोग बरे होतात, असा अनुभव अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे आता पुरातत्व विभागाने या विहिरींच्या संरक्षणासाठी योजना आखली असून त्यांचा लवकरात लवकर जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. दिल्लीत अशा किमान बारा विहिरीत असाव्यात, असे अनुमान आहे. सध्या या दोन विहिरींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या विहिरींच्या पाण्यात जंतूनाश करणाऱया रसायनांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. सध्या या विहिरी वापरात नसल्याने पाण्याचा उपसा होत नाही. तसेच त्या पडलेल्या अवस्थेत आणि दुर्लक्षित आहेत.

या विहिरींचे सर्वेक्षण केल्यानंतर त्यातील पाण्याचा हा अद्भूत गुण समोर आला आहे. दिल्लीतील मेहरोली येथे ‘राजोंकी बावली’ (राजांची विहीर) नामक स्थान असून तेथे या प्रकारची एक विहीर आहे. ही विहीर आता संरक्षित जागा म्हणून घोषित करण्यात आली आहे. विहिरीच्या पायऱया आणि प्रवेशद्वार नव्याने बांधण्यात आले आहे. दुसरी विहीर ‘गंधकीकी बावली’ म्हणून ओळखली जाते. या विहिरीच्या पाण्याने स्नान केल्यास चर्मरोग दूर होतात. अनेक लोक या विहिरीवर आंघोळीसाठी सातत्याने येत असतात. अशा दिल्लीत बारा विहिरी असून सर्व विहिरींचा शोध सुरू आहे. दोन विहिरींच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण होत आले आहे. आता या विहिरींमधील झरे मोकळे झाले असून त्या भरू लागल्या आहेत. त्यात साठलेला कचरा आणि चिखल उपसण्यात आला आहे. या विहिरींमधील पाण्याची चाचणी सातत्याने केली जात असून औषधी गुणधर्म सिद्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे. अशाच विहिरी दिल्लीच्या सीमारेषेवरील राज्यांमध्ये असू शकतील, असे अनुमान असून तेथेही पुरातत्व विभागाकडून संशोधन सुरू आहे.









