खोची/वार्ताहर
शुक्रवारी रात्री ढगफटीसदृश पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नरंदे ता. हातकणंगले येथील गिड्डे मळ्याजवळील ओढ्याच्या पाण्यातून वाहून गेलेल्या दानोळी येथील आनंदी गणेश राजमाने (वय ३९) या शेतमजूर महिलेचा मृतदेह शनिवारी सकाळी ओढ्याच्या पात्रात मिळाला. तसेच वाहून गेलेल्या दोन्ही मोटार सायकलीही आढळून आल्या. यावेळी घटनास्थळी नरंदे, दानोळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
दानोळी येथील पाच शेतमजूर नरंदे येथे भाजीपाला शेतमजुरीसाठी आले होते. अंधार, विजांचा कडकडाट आणि पावसाची संततधार यामुळे त्यांची गावाकडे जाण्यासाठी दुचाकीवरून धडपड चालू होती. ते गावाकडे जात असताना ओढ्यातून वाहून गेले होते. त्यापैकी चौघेजण पाण्यातून बाहेर आले. परंतु आनंदी राजमाने या मात्र ओढ्यातून वाहून गेल्या होत्या. त्यांचा मृतदेह सकाळी सापडला. दरम्यान, त्यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले असून त्यांना दोन विविहित मुली आहेत. त्या एकट्याच राहत होत्या.
शुक्रवारी सायंकाळी या भागात पुन्हा ढगफुटी सदृश पाऊस पडला. त्यामुळे या ओढ्याला प्रचंड पाणी आले होते.पाण्याच्या प्रवाहाला प्रचंड दाब होता.अशा परिस्थितीत सर्वांनी ओढा ओलांडण्याचा प्रयत्न करीत असताना जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे ते सर्व जण मोटरसायकल सह वाहून गेले.यातील रमेश सांगले,
सदाशिव क्षीरसागर,लक्ष्मीबाई कोळी हे थोडया अंतरावरून पाण्यातून वर आले.त्यापुढे २०० मीटर अंतरावर सदाशिव थोरात हे झाडाला अडकल्याचे परिसरात राहणारे शेतकरी महावीर एडवान यांनी पाहिले.त्यांनी दोरी टाकून थोरात यांना बाहेर काढून जीव वाचविला.विशेष म्हणजे सदाशिव थोरात यांनी आनंदी राजमाने यांचा हात पकडून त्यांना आधार दिला होता.पण पाण्यातून वाहत आलेल्या लाकडाच्या ओंडकाचा त्यांना धक्का लागल्याने हातातून हात निसटून त्या प्रवाहाबरोबर पुढे गेल्या. अन्यथा त्यांचाही जीव वाचला असता, अशी माहिती घटनास्थळावर मिळाली.
यावेळी नागरिकांनी शोध व बचाव कार्य रात्री पावसात केले. दानोळी येथील नागरिकांनीही रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. मात्र शनिवारी सकाळी ग्रामस्थांना हा मृतदेह ओढ्याच्या पात्रात झुडुपात डकलेला दिसला. त्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. विशेष म्हणजे महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभागाचा एकही अधिकारी सकाळी लवकर घटनास्थळी आलेले नव्हते. तसेच पोलीस विभागाचे कर्मचारीही सकाळी उशिरा पोहोचले. त्यामुळे ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या.