वीजेचा लखलखाट आणि गडगडाट.अनेक ठिकाणी पाणीच पाणी.बेसावध लोकांची उडाली तारांबळ.
डिचोली/प्रतिनिधी
परतीच्या पावसाने काल शुक्र. दि. 14 ऑक्टो. रोजी डिचोली तालुक्मयात दमदार हजेरी लावली. वीजेचा लखलखाट आणि गडगडाटासह आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळच उडाली. शहरात तसेच ग्रामीण भागांमध्येही पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. तर काही ठिकाणी साचलेही होते.
सप्टेंबर महिना संपल्यावर पावसाळा संपुष्टात येणार हि कल्पना प्रत्येकाला होतीच. त्यामुळे हा परतीचा पाऊस अपेक्षितही होता. गेले अनेक दिवस सकाळी व बहुतेक संध्याकाळी आभाळ दाटून येणाऱया पावसाने काल शुक्रवारी संध्याकाळी रौद्ररूप धारण केले. संध्याकाळी 3.30 नंतर डिचोली तालुक्मयातील बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली. यावेळी वीजेचा लखलखाट आणि गडगडाट सुरू झाला.
डिचोली व साखळी शहरात व बाजारात या अचानकपणे आलेल्या पावसाचा मोठा परिणाम जाणवून आला. जोरदार पावसामुळे बाजारपेठ सुन्न झाली होती. तसेच लोकांचीही रस्त्यावरील वर्दळ कमी झाली होती. डिचोली बाजारात अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून येत होते. त्यामुळे ते वाहनांमुळे लोकांच्या अंगावर उसळत होते. साखळीतही जोरदार पावसामुळे पाणी रस्त्यावरून वाहण्याचे प्रकार पहायला मिळाले.
या लहरी पावसाने काल बराच वेळ जोरदारपणे बरसात सुरूच ठेवल्याने छत्री व रेनकोट न घेताच बाहेर पडलेल्या लोकांची तारांबळ उडाली. कारण पावसाचा मारा रात्रीपर्यंत सुरूच होता. या पावसामुळे चोडण व रोलिंग मिलजवळ डिचोली येथे झाडे रस्त्यावर पडल्याच्या घटना घडल्या. डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी शैलेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी सदर झाडे हटवली.









