वाराणसी जिल्हा न्यायालयाचा निर्णय, हिंदू पक्ष उच्च न्यायालयात जाणार
वाराणसी / वृत्तसंस्था
वाराणसीतील ज्ञानवापी परिसरात आढळलेल्या शिवलिंगाचे कार्बन डेटिंग करण्याचा आदेश देण्यास येथील जिल्हा न्यायालयाने नकार दिला आहे. कार्बन डेटिंगची मागणी हिंदू पक्षाने केली होती. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात हिंदू पक्ष आता वरच्या न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहे.
न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांनी हिंदू पक्षाची मागणी नाकारण्यासाठी काही कारणे दिली आहेत. कार्बन डेटिंग करण्यासाठी या शिवलिंगाचा काही भाग वेगळा करावा लागणे शक्य आहे. त्यामुळे शिवलिंगाला धोका होऊ शकतो. तसे झाल्यास तो संवेदनशील मुद्दा बनू शकतो. हे महत्वाचे कारण देण्यात आले आहे.
पूजा करु देण्याची मागणी
काही महिन्यांपूर्वी पाच हिंदू महिलांनी ज्ञानवापी परिसरातील श्रृंगार गौरी मंदिरात पूजाअर्चा करण्याची अनुमती मागण्यासाठी जिल्हा न्यायालयात आवेदनपत्र सादर केले होते. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने या संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण आणि व्हिडीओग्राफी करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार सर्वेक्षण आणि चित्रण करण्यात आले. हेच सर्वेक्षण होत असताना ज्ञानवापीतील तलावात एक शिवलिंगसदृश रचना आढळली होती. हे प्राचीन शिवलिंग आहे, असे हिंदू पक्षाचे प्रतिपादन आहे. तर मुस्लीम पक्षाने तो कारंजा असल्याचे म्हटले होते. ही रचना नेमकी काय आहे, हे निर्धारित करण्यासाठी तिचे कार्बन डेटिंग करावे अशी मागणी हिंदू पक्षाची होती. मात्र, ती न्यायालयाने फेटाळली असल्याने आता हिंदू पक्ष उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करण्याच्या तयारीत आहे.









