खोची/प्रतिनिधी
खोचीसह परिसरात शुक्रवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नरंदे ता. हातकणंगले येथील गिड्डे मळ्याजवळील ओढ्याच्या पाण्यात तिघेजण वाहून जाण्याचा प्रकार घडला आहे. यातील दोघांचा शोध लागला असून एक महिला बेपत्ता आहे. आनंदी गणेश राजमाने (रा. दानोळी, ता.शिरोळ वय ३९) असे बेपत्ता असलेल्या महिलेचे नाव आहे. मुसळधार पाऊस, अंधार पडल्याने वाहून गेलेल्या महिलेचा शोध घेण्यास अडथळा येत आहे.
तर रमेश अण्णासाहेब सांगोले , सदाशिव नंदू थोरात, दादासो गुरुजी क्षीरसागर, लक्ष्मीबाई कोळी हे सर्वजण (रा. दानोळी ता. शिरोळ) मधील असल्याची माहिती मिळत आहे. तर वाहून गेलेल्या महिलेचा शोध गावातील नागरिक घेत आहेत.
दरम्यान, मिळालेली माहिती अशी की, दानोळी येथील तीन पुरुष व दोन महिला ह्या शेती कामासाठी नरंदे येथील गिड्डे मळ्यात आल्या होत्या. सायंकाळी प्रचंड जोरदार पाऊस आल्याने ते घराकडे जाण्याच्या गडबडीने पावसातच ओढ्याच्या पाण्यातूनच बाहेर पडत होते. त्याच वेळी दोन पुरुष व एक महिला पाण्यात उतरताच पाण्याचे प्रवाह बरोबर वाहत गेले. यामधील दोन पुरुष अर्धा किलो मीटर अंतर वाहत गेले. परंतु त्यांनी झाडाच्या फांद्यांचा आधार घेत आपला जीव वाचवला. पण एक महिला पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली. सदर महिलेचा नरंदे ग्रामस्थ, दानोळी येथील युवक शोध घेत आहेत. सदर लोक हे मोटरसायकल वरून शेती कामासाठी आले होते.
सदर घटनेची माहिती मिळताच हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे यांनी या घटनेची माहिती घेऊन सदर महिलेच्या शोध मोहिमेसाठी रेस्क्यू फोर्स पाचारण करत असल्याचे सांगून सदर महिलेचा तात्काळ शोध घेणार असल्याचे सांगितले.