आगामी काळातही वाहन क्षेत्रात सकारात्मक कल राहणार असल्याचे अभ्यासकांचे मत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सणासुदीच्या काळात सप्टेंबरमध्ये डिलर्सना वाहनांचा पुरवठा जोरात होता. ऑटोमोबाईल कंपन्यांनी गेल्या महिन्यात 1,42,727 कार्स डिलर्सना वितरीत केल्या. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये विकल्या गेलेल्या 64,235 कार्सच्या तुलनेत यंदाचे हे प्रमाण 122 टक्के अधिक आहे. एकूण प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीतही गेल्या महिन्यात 92 टक्के वाढ झाली आहे.
गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, ऑटो कंपन्यांनी सप्टेंबरमध्ये त्यांच्या विक्रेत्यांना एकूण 3,07,389 वाहनांचा पुरवठा केला. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हा आकडा 1,60,212 होता. प्रवासी वाहनांमध्ये कार, युटिलिटी वाहने आणि व्हॅनचा समावेश होता.
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या मते, दुचाकींची घाऊक विक्री देखील 13 टक्क्यांनी वाढून 17,35,199 वाहनांवर गेली आहे. गेल्या वर्षी ती 15,37,604 वर पोहोचली होती. त्याचप्रमाणे मोटारसायकलच्या घाऊक विक्रीत 18 टक्के आणि स्कूटरच्या घाऊक विक्रीत 9 टक्के वाढ झाली आहे.
विक्रीचा कल कायम राहण्याची शक्यता
सियामचे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी सांगितले की, सर्व विभागांमध्ये वाहनांची विक्री वाढली आहे. हा ट्रेंड ऑक्टोबरमध्येही कायम राहण्याची शक्यता आहे. सियामचे महासंचालक राजेश मेनन म्हणाले की, सप्टेंबर महिना उद्योगासाठी चांगला ठरला आहे. आर्थिक वर्षाच्या सहामाहीत 19.36 लाख प्रवासी वाहन विक्रीची नोंद झाली आहे.









