दरीत मिळते फिनोलेक्स टॉवरची रेंज
प्रतिनिधी/रत्नागिरी
रत्नदुर्ग किल्ल्याच्या 200 फूट खोल दरीत तन्वी घाणेकर हिच्या आढळलेल्या मृतदेहाच्या तपास कामात पोलीस सर्व शक्यतांची पडताळणी करत आहेत़ याचाच एक भाग म्हणून तन्वीचा मृतदेह आढळून आलेल्या 200 फूट खोल दरीत मोबाईलचे लोकेशन ट्रॅकिंग करण्यात आल़े. या दरीत रत्नागिरी शहरातील मोबाईल टॉवर रेंज पकडत नसून फिनोलेक्स येथील टॉवरची रेंज मिळत असल्याचे समोर आल़े. यामुळेच तन्वीचे अखेरचे मोबाईल लोकेशन पावस-कोळंबे दाखवत होते, असा निष्कर्ष पोलिसांनी काढल्याचे सांगण्यात आले.
शहरातील खालचा फगरवठार येथील तन्वी रितेश घाणेकर (33) 29 सप्टेंबर 2020 पासून बेपत्ता झाली होत़ी या संदर्भात तिचा पती रितेश याच्याकडून रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार करण्यात आली होत़ी. पोलिसांच्या शोधमोहिमेत तन्वीची दुचाकी भगवती बंदर येथे आढळून आल़ी. तन्वीचे अखेरचे मोबाईल लोकेशन पावस-कोळंबे भागात दाखवण्यात येत होत़े यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले होत़े.
दरम्यान 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी तन्वीचा मृतदेह रत्नदुर्ग किल्ल्याच्या कपल पॉईंट येथील 200 फूट दरीत आढळून आल़ा. रत्नदुर्ग किल्ल्याच्या दरीत आढळला असताना पावस-कोळंबे लोकेशन कसे, असा प्रश्न उपस्थित होत होत़ा. यासंबंधी पोलिसांच्या सुरूवातीच्या तपासात कपल पाँईटच्या समोर फिनोलेक्स कंपनी येथे मोबाईल टॉवर आह़े. रत्नदुर्ग किल्ला परिसरात शहरातील मोबाईल टॉवरची रेंज मिळत असली तरी खोल दरीत फिनोलेक्स टॉवरची रेंज मिळत असल्याचे प्राथमिक तपासामध्ये समोर आले होत़े.
हे ही वाचा : जिल्हा नियोजनची सर्व विकासकामे ६ महिन्यात पूर्ण करा – मंत्री उदय सामंत
तन्वी घाणेकर बेपत्ता झाल्यापासून रत्नागिरी परिसरात उलटसुलट चर्चा सुरू होत्य़ा. त्यानुसार पोलिसांकडून सर्व शक्यतांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आल़ा. त्याचाच एक भाग म्हणून रत्नदुर्ग किल्ल्याच्या कपल पाँईट येथील खोल दरीत पोलिसांचे पथक पाठवण्यात आल़े येथे मोबाईलला कोणती रेंज मिळते, याची पडताळणी करण्यात आल़ी. त्यामध्ये दरीत फिनोलेक्स येथील टॉवरची रेंज मिळत असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल़े.
तन्वी घाणेकरचा मृतदेह रत्नदुर्गच्या दरीत आढळून आल्यानंतर तिच्या मोबाईलचा शोध पोलिसांकडून घेण्यात आल़ा. मात्र जंगलमय परिसर व अतिशय खोल दरी यामुळे ही शोधमोहीम राबवणे अवघड बनले आहे. त्यामुळे घटनेच्या 15 दिवसानंतरही तन्वीच्या मोबाईलचा शोध लागलेला नाह़ी.









